अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद
कल्याण – मध्य रेल्वेच्या आटगाव ते तानशेत रेल्वेस्थानकांच्या दरम्यान ६ जानेवारीच्या मध्यरात्री अज्ञाताने १ फूट लांबीची लोखंडी पट्टी रेल्वेरूळांवर ठेवून घातपात करण्याचा प्रयत्न केला. ओव्हरहेड वायरचे इंजिन या रेल्वे रूळांवरून जात असतांना इंजिनच्या दर्शनी भागाला या लोखंडी पट्टीचा फटका बसला. प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण होईल, अशी कृती करण्यात आल्याने या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कसारा येथील लोहमार्ग पोलीस ठाण्याचे हवालदार नीलेश मोरे यांनी तक्रार प्रविष्ट केली. आटगाव ते तानशेत रेल्वेस्थानकांच्या दरम्यान किलोमीटर नंबर ९५-३८ या ठिकाणी ही लोखंडी पट्टी रेल्वे रूळावर ठेवण्यात आली होती.
वेगात असलेल्या इंजिनच्या दर्शनी भागाला लोखंडी पट्टीचा जोराने फटका बसल्यावर इंजिन खडबडले. प्रसंगावधान राखत लोकोपायलटने इंजिन पुढे जाऊन थांबवले. त्यांनी इंजिनमधून उतरून इंजिन जेथे खडबडले, त्या रूळाच्या भागाची पहाणी केल्यावर तेथे त्यांना लोखंडी पट्टी आढळली. त्यांनी ही माहिती तातडीने पोलिसांत दिली. सुदैवाने या रेल्वे मार्गावरून इंजिन जात होते; म्हणून हा प्रकार निदर्शनास आला. एक्सप्रेस किंवा मेल या मार्गावरून वेगाने धावत असती, तर मोठा अनर्थ झाला असता, अशी माहिती मिळते.
संपादकीय भूमिका :असे करणार्यांवर कठोर कारवाई करून त्यांना कायमस्वरूपी कारागृहातच डांबले पाहिजे ! |