सांकवाळ येथील ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या वारसा स्थळी फेस्ताचे आयोज करण्यास अनुमती देऊ नका !

‘हिंदू रक्षा महाआघाडी’ची पणजी येथे धरणे आंदोलनाद्वारे मागणी

आंदोलनाच्या वेळी पत्रकारांना माहिती देतांना श्री. जयेश थळी, श्री. सत्यविजय नाईक आणि श्री. नितीन फळदेसाई

पणजी, ७ जानेवारी (वार्ता.) – शंखवाळ (सांकवाळ) येथील ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ (पुरातन श्री विजयादुर्गादेवीचे मंदिर असलेले ठिकाण) या वारसा स्थळ फेस्ताचे आयोजन करण्यास पुरातत्व खात्याने अनुमती देऊ नये, अशी मागणी ‘हिंदू रक्षा महाआघाडी’ने ७ जानेवारी या दिवशी आझाद मैदान, पणजी येथे आयोजित केलेल्या धरणे आंदोलनाद्वारे केली आहे. ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या ठिकाणी चर्च संस्थेच्या वतीने ७ जानेवारीपासून फेस्ताचे आयोजन केले जात आहे आणि हे फेस्त १६ जानेवारीपर्यंत चालणार आहे. फेस्ताच्या आयोजनासाठी वारसा स्थळी गेल्या काही दिवसांपासून अहोरात्र अनधिकृतपणे मंडप उभारणी आदी कामे जोमाने चालू आहेत. या पार्श्‍वभूमीवर ‘हिंदू रक्षा महाआघाडी’ने ही मागणी केली आहे. या वेळी आंदोलनामध्ये ‘हिंदू रक्षा महाआघाडी’, ‘भारत माता की जय’, ‘हिंदु जनजागृती समिती, ‘गोमंतक मंदिर महासंघ’ आदी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी ‘हिंदू रक्षा महाआघाडी’चे सर्वश्री नितीन फळदेसाई, ‘गोमंतक मंदिर महासंघा’चे श्री. जयेश थळी आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. सत्यविजय नाईक यांनी धरणे आंदोलनाविषयी माहिती दिली.

आझाद मैदानातील आंदोलनात करण्यात आलेल्या मागण्या

१. वारसा स्थळी कोणत्याही अनधिकृत बांधकामांना अनुमती देऊ नये.

२. वारसा स्थळी अनधिकृत बांधकाम केल्याचे पुरातत्व खाते आणि वास्को नियोजन अन् विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त सर्वेक्षण अहवालात नमूद केलेले आहे आणि अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची सूचना जिल्हा प्रशासन अन् पोलीस यांना करण्यात आली आहे, तरीही अनधिकृत बांधकामांवर कोणतीच कारवाई न करणार्‍या संबंधित कर्तव्यचुकार अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करावी.

३. वारसा स्थळी उभारण्यात आलेले अनधिकृत क्रॉस त्वरित हटवावे.

४. फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ म्हणजेच पुरातन श्री विजयादुर्गादेवीचे मंदिर असलेल्या ठिकाणाची पावित्र्य अबाधित ठेवावे.

५. वारसा स्थळी भूमीत गाडलेल्या मंदिरांच्या अवशेषांचे उत्खनन करावे.