श्री. अरविंद पानसरे यांचा (२४.१२.२०२०) मार्गशीर्ष शुक्ल पक्ष दशमी या दिवशी वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांच्या पत्नी सौ. मनीषा आणि त्यांचे सासू-सासरे यांना त्यांच्याविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. सौ. मनीषा पानसरे (श्री. अरविंद यांच्या पत्नी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१ अ. संतांप्रतीचा भाव : ‘विवाहाच्या वेळी त्यांनी माझे नाव न पालटता पूर्वीचेच माझे ‘मनीषा’ हे नाव ठेवले. यात त्यांचा विचार होता, ‘मी पूर्वी काही काळ परात्पर गुरु डॉक्टरांच्या समवेत ग्रंथाची सेवा केली होती. माझे नाव पालटले, तर परत त्यांना माझे नवीन नाव लक्षात ठेवून तशी हाक मारावी लागेल. ‘संतांना त्रास नको’, हा त्या मागचा उद्देश होता.
१ आ. प्रामाणिकपणे आणि मोकळेपणाने मनातील विचार सांगणे : ‘श्री. अरविंद प्रामाणिकपणे त्यांच्या मनात येणारे चांगले- वाईट प्रसंग मोकळेपणाने सांगतात. त्यात कुठेच प्रतिमेचा भाग नसतो. आमचा विवाह ठरल्यानंतर परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला एकमेकांची स्वभावदोष सारणी पहायला सांगितली होती. माझी सारणी अरविंद यांना दाखवायला माझ्या मनात थोडे प्रतिमेचे विचार येत होते; परंतु त्यांनी काहीही विचार न करता मला स्वतःची सारणी लिहिलेली वही वाचायला दिली.
१ इ. ‘कधी समवेत रहायला पाहिजेे’, असा आग्रह न करणे आणि प्रत्येक वेळी सेवेला प्राधान्य देण्यास सांगणे : आमचा विवाह झाल्यानंतर काही मासांतच मी परत रामनाथी आश्रमात येऊन सेवा करू लागले. श्री. अरविंद यांची सेवा मुंबईला असल्याने ते देवद आश्रमात राहून सेवा करत होते. तेव्हा ‘त्यांनी मला कधीच त्यांच्या समवेत रहायला पाहिजेे’, असा आग्रह केला नाही. दिवाळीच्या काळात आम्ही नेहमी घरी जातो. काही वर्षांपूर्वी दिवाळीच्या काळात मला आश्रमात सेवा असल्याने घरी येण्याविषयी श्री. अरविंद यांच्याशी चर्चा केली. तेव्हा त्यांनी सेवेला प्राधान्य देण्यास सांगून निर्णय माझ्यावर सोडून दिला. ते कौटुंबिक प्रसंगात तत्त्वनिष्ठ असतात.
१ ई. समाधानी वृत्ती : अरविंद यांना चांगले कपडे खरेदी करणे, हौस करणे यांची जराही आवड नाही. आहे तेवढ्या कपड्यांमध्येच ते समाधानी असतात. त्यांना पुष्कळ वेळ समजावून सांगितल्यावर मग ते खरेदीला यायला सिद्ध होतात.
१ उ. इतरांच्या मताचा आदर करणे : विवाहाआधी श्री. अरविंद यांचे अधिकोशामध्ये खाते नव्हते. त्यांची पैसे साठवण्याचीही वृत्ती नव्हती. विवाहानंतर आम्ही दोघांनी एकत्र खाते उघडल्यावरही जो काही व्यवहार असेल, तो ते मलाच करायला सांगतात. त्यांना कोणता आर्थिक व्यवहार करायचा असेल, तर प्रत्येक वेळी ते माझे मत घेऊन चर्चा करूनच निर्णय घेतात.
१ ऊ. साधनेत साहाय्य करणे : मला आध्यात्मिक त्रास असल्याने ते वेळोवेळी मला समजून घेऊन साहाय्य करतात. माझ्या साधनेची स्थिती चांगली नसते, तेव्हा ते मला आधार देऊन योग्य दृष्टीकोन देतात.
१ ए. मायेत न अडकणे : माझ्या आध्यात्मिक प्रगतीविषयी त्यांना पुष्कळ आनंद होतो. अरविंद यांना स्वतःची किंवा माझी जन्मतिथी कधीच लक्षात नसते; पण प्रतिवर्षी माझी आध्यात्मिक प्रगतीची टक्केवारी किती आहे, हे मात्र ते कधीच विसरत नाही.
१ ऐ. अहं अल्प असणे : ते संतांच्या सत्संगानंतर स्वतःचे कौतुक सांगण्याआधी माझ्याविषयी त्या संतांनी काय सांगितले, हे पुष्कळ आनंदाने सांगतात. त्यात कुठेच दोघांमध्ये तुलना नसते किंवा अहं नसतो.
१ ओ. घरीही सहजतेने वागणे आणि घरातील स्वच्छता करतांना पुष्कळ साहाय्य करणे अन् ‘आश्रमात रहात आहोत’, याच भावाने रहाणे : माझ्या आई-वडिलांशी वागतांना ते जावई म्हणून न वागता ‘एक साधक’ म्हणूनच वागतात. त्यामुळे आम्ही एकत्र असतांना वागण्यात पुष्कळ सहजता असते. घरी असतांनाही ‘ते आश्रमात रहातो’, याच भावाने रहातात. सध्या कोरोनाच्या स्थितीमुळे आमच्या घरी कामवाली बाई (गृहकृत्य साहाय्यक) नाही. त्यात मला सायटिकाचा त्रास होत असल्याने मला घरची स्वच्छता करण्यात मर्यादा येत होत्या. या स्थितीत ते घरची नियमित स्वच्छता करायला मला पुष्कळ साहाय्य करतात. स्वच्छता करतांना जशी आश्रमात करतो, त्याच पद्धतीने ते करतात.
१ औ. नामजपादी उपायांचे गांभीर्य असणे : दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये आलेल्या विविध चौकटीनुसार सर्व नामजपादी उपाय करणे, स्त्रोत्र ऐकणे या संदर्भात श्री. अरविंद यांचे गांभीर्य पुष्कळ आहे. रात्री कितीही थकलेले असले, तरी ते उपाय आणि वस्तूंची शुद्धी नियमित करतात.
१ अं. श्री. अरविंद यांच्यात जाणवलेले पालट
१. अलीकडे संतांनीही सांगितले आहे की, ‘श्री. अरविंद यांच्यामध्ये पालट झाला आहे.’
२. श्री. अरविंद यांची वैयक्तिक आवरणे किंवा सेवा करतांनाची गती न्यून असायची. आता ती वाढल्यासारखी जाणवते.
३. पूर्वी थोडी जरी शारीरिक सेवा केली किंवा सेवेनिमित्त प्रवास केला, तर त्यांना लगेच थकायला होऊन विश्रांती घ्यावी लागायची; पण आता त्यांची शारीरिक क्षमताही वाढली आहे.
४. पूर्वी आश्रमात ते आणि त्यांची सेवा इतकेच होते. आता ते सर्वांशी बोलायला लागले आहेत आणि सर्वांमध्ये मिसळू लागले आहेत.’
२. सौ. लक्ष्मी जाधव (श्री. अरविंद यांच्या सासूबाई), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
२ अ. श्री. अरविंद यांचे रहाणीमान अगदी साधे आणि टापटीप असते.
२ आ. व्यवस्थितपणा : ते स्वच्छतेला पुष्कळ महत्त्व देतात. अंघोळ झाल्यावर ते स्नानगृह इतके स्वच्छ करून बाहेर येतात की, ‘कुणी अंघोळ केलीच नाही’, असे वाटते.
२ इ. त्यांचे बोलणे नम्रतेने आणि मोजके असते. ते कधीही अनावश्यक बोलत नाहीत.
२ ई. जाणवलेले पालट
२ ई १. त्यांच्या तोंडवळ्यावर पूर्वीपेक्षा तेज जाणवते.
२ ई २. श्री. अरविंद पूर्वी वृत्तवाहिनीवर (चॅनल) चर्चासत्रासाठी जात, तेव्हा त्यांच्या बोलण्यात भीती जाणवायची; पण आता पुष्कळ पालट जाणवतो. आता सूत्रे ठामपणे मांडतांना त्यात आत्मविश्वास असतो. त्यामुळे समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पडतो.’ (१५.१२.२०२०)
एकलव्य जणू एकच लक्ष, पत्रकारितेत एकदम दक्ष ।प्रति महर्षि (टीप १) रूप जावई आमुचा । चौथ्या (टीप २) खांबाची समजतात एक वीट । एकलव्य जणू एकच लक्ष । सामाजिक समस्या खांद्यावर घेतल्या । सोंग घेतलेल्याला जागे करणे । अनीती, असमाधान, अशांती, स्वार्थ । स्वराज्याचे सुराज्य व्हावे । दैनिक ‘सनातन प्रभात’ समाज सन्मुख व्हावे । सततचा एकच ध्यास । नित्य नवा दिस जागृतीचा । टीप १ – महर्षि अरविंद – श्री. कोंडिबा जाधव (श्री. अरविंद यांचे सासरे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. |
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |