सावंतवाडी – महाराष्ट्र सरकारने शेतकर्यांची फसवणूक केली आहे. त्यांनी केलेल्या घोषणांपैकी एकही साहाय्य शेतकर्यांना मिळालेले नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात बांधकाम घोटाळे झाले असून हे मी उघडकीस आणले आहेत. त्यामुळे घोटाळे करणार्यांवर कारवाई करावी, अन्यथा मी उच्च न्यायालयात दाद मागणार आहे, अशी चेतावणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.
देवेंद्र फडणवीस कोल्हापूर येथून आंबोलीमार्गे गोवा येथे जात असतांना सावंतवाडी येथे थांबले होते. सिंधुदुर्ग जिल्हा भाजपच्या वतीने सावंतवाडी शहरात त्यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली आदी भाजपच्या नेत्यांनी फडणवीस यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
काँग्रेसच्या काळात ‘इडी’सारख्या संस्थांचा गैरवापर !
त्यानंतर पत्रकारांना फडणवीस म्हणाले, ‘‘राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या मोठ्या नेत्यांना, त्यांच्या नातेवाइकांना अंमलबजावणी संचालनालयाने (‘इडी’ने) समन्स बजावले आहे. ज्यांच्या विरोधात तक्रारी अथवा पुरावे आहेत, त्यांची चौकशी केली जाईल, जर आपण काही केले नसेल, तर घाबरण्याचे कारण नाही. कोणतीही ‘एजन्सी’ थेट कारवाई करत नाही. काँग्रेसच्या काळात ‘इडी’सारख्या एजन्सीचा गैरवापर झाला.’’