उत्तरप्रदेशात जातीचे स्टिकर्स असलेल्या गाड्यांवर होणार कारवाई

महाराष्ट्रातील शिक्षकाने पाठवलेल्या पत्रावर पंतप्रधान कार्यालयाची सूचना

  • शिक्षकाने पत्र पाठवले नसते आणि पंतप्रधान कार्यालयाने सूचना केली नसती आणि उत्तरप्रदेशात जातीचे स्टिकर्स असलेल्या पाट्या कायम राहिल्या असत्या.  यावरून प्रशासन आणि पोलीस किती निष्क्रीय आहेत, हे लक्षात येते ! ‘असा प्रकार आणखी किती राज्यांत होत असणार याकडे आता ती राज्ये लक्ष देणार आहेत का ?’ असा प्रश्‍नही उपस्थित होतो !
  • एकीकडे सर्व राजकीय पक्ष जातपात नष्ट करण्याची भाषा करतात; मात्र दुसरीकडे जातीचे राजकारण खेळत अशा घटनांकडे दुर्लक्ष करतात !
गाड्यांवर लावलेली जातीचे स्टिकर्स

नवी देहली – उत्तरप्रदेशमध्ये वाहनांच्या क्रमांकाच्या पाट्यांवर जातीचे नाव लिहिण्याची पद्धत चालू आहे. यात यादव, जाट, गुर्जर, ब्राह्मण, पंडित, क्षत्रिय, लोधी, मौर्य अशा विविध जातींच्या नावाचे स्टिकर्स तेथे लावले जात आहेत. यातून जातीचे महत्त्व दाखवण्याचा प्रयत्न केला आहे; मात्र आता उत्तरप्रदेशच्या वाहतूक विभागाने अशा प्रकारे जातीची ओळख सांगणार्‍या गाड्यांवर कारवाई करणे चालू केले आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून सूचना मिळाल्यानंतर वाहतूक विभागाने हे पाऊल उचलले आहे. अशा स्टिकर्स असलेल्या गाड्या जप्त करण्यात येणार आहेत.

महाराष्ट्रातील शिक्षक हर्षल प्रभु यांनी पत्र पाठवल्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने या विषयात लक्ष घातले. हर्षल प्रभु यांनी सांगितले की, अशा पद्धतीचे स्टिकर्स म्हणजे आपली जी सामाजिक वीण आहे, त्याला एकप्रकारे धोका निर्माण करण्यासारखे आहे.