गडदुर्गांवरील पवित्र जल संग्रहित करणार !
मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडदुर्गांवरील पवित्र जल संग्रहित करण्यात येणार असून ते मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवण्यात येणार आहे. राज्यशासनाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेसाठी शासनाच्या वतीने ५ लाख रुपयांचा निधी संमत करण्यात आला. शिवनेरी, सिंहगड, लाल महाल, तोरणा, पुरंदर, प्रतापगड, रायरेश्वर, राजगड आणि रायगड अशा ९ गडांवर यासाठी मार्गक्रमण करण्यात येईल.
कुत्र्यांना ठरलेल्या जागेत खाद्यपदार्थ देणे बंधनकारक !
मुंबई – पाळीव आणि भटक्या कुत्र्यांना मुंबई महापालिकेने निश्चित केलेल्या जागेवरच खाद्यपदार्थ देणे बंधनकारक करण्यात येणार आहे. याविषयीची नियमावली सिद्ध करण्यात येत आहे. याचा प्रस्ताव पालिका आयुक्तांकडे संमतीसाठी सादर करण्यात आला आहे.
‘कोल्डप्ले’ संगीत कार्यक्रमात लहान मुलांना बंदी !
नवी मुंबई – नवी मुंबईत प्रथमच जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या ‘कोल्डप्ले’ या संगीत कार्यक्रमाचे आयोजन डॉ. डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये करण्यात आले आहे. १८ ते २१ जानेवारी या काळात हा कार्यक्रम होईल. येथे लहान मुलांना घेऊन जाण्यावर जिल्हा बालसंरक्षण विभागाने बंदी घालण्यात आली आहे. संगीत कार्यक्रमात आवाजाची पातळी १२० डेसिबलपेक्षा अधिक रहाणार असल्याने लहान मुलांना त्रास होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर ही सूचना करण्यात आली.
संपादकीय भूमिका: ध्वनीप्रदूषण वाढवणार्या अशा कार्यक्रमांचे आयोजनच का केले जाते ? अशा कार्यक्रमांवर बंदीच आणायला हवी !
सिंदफळ (तुळजापूर) येथे कुष्ठरोग पथकाकडून गंभीर चूक
सिंदफळ (तुळजापूर) – येथे कुष्ठरोग निरीक्षण करणार्या पथकाकडून चुकीचे उपचार करण्यात आल्याने इयत्ता ९ मध्ये शिकणार्या मुलीला गंभीर आजाराला तोंड द्यावे लागत आहे. मुलीला पी बी (कुष्ठरोग) या असंसर्गजन्य आजाराची लक्षणे असल्याचे परीक्षण झाल्याने कुष्ठरोग पथकाने तिला उपचारासाठी गोळ्या दिल्या होत्या. मुलगी जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे. (यामुळे आरोग्य कर्मचार्यांवरील जनतेचा विश्वास उडाला, तर नवल ते काय ? – संपादक)