|

पिंपरी (पुणे) – बीडमधील पवनचक्की उद्योजकांकडे खंडणी मागणे आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मकोका) अटक असलेल्या वाल्मिक कराड याची वाकड येथील सदनिका लाखबंद (सील) करण्यात येणार आहे. या सदनिकेचा १ लाख ५० सहस्र रुपये मालमत्ता कर थकीत आहे. या सदनिकेवर २१ नोव्हेंबर २०२४ या दिवशी जप्ती अधिपत्र चिकटवले आहे.
वाकड येथील ‘पार्क स्ट्रीट गृहनिर्माण सोसायटी’च्या ‘आयव्हरी’ इमारतीच्या ६ व्या मजल्यावर ६०१ क्रमांकाची सदनिका आहे. १६ जून २०२१ या दिवशी त्याचे खरेदीपत्र करण्यात आले आहे. ही सदनिका खरेदी केल्यापासून वाल्मिक कराड याने मालमत्ता कर भरलेला नाही. त्यांची एकूण थकबाकी १ लाख ५५ सहस्र ४४४ रुपये आहे, तसेच कराड यांची वाकड येथे आणखी एक सदनिका आहे. त्याची १ लाख ५५ सहस्र रुपयांची थकबाकी आहे. थकबाकी न भरल्यास या मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती कर आकारणी आणि कर संकलन विभागाचे साहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी दिली आहे.