प्रसिद्ध गायक, नृत्य कलाकार यांचे कार्यक्रम लोकांना पहाता येणार
प्रयागराज – कुंभनगरीसाठी अल्प वेळ होता; मात्र सर्वांच्या सहकार्यामुळे आतापर्यंत २ स्नान यशस्वीरित्या पूर्ण झाले. काही भाविक पुन्हा गेले. काही अजूनही येथे आहेत. आता पुढील स्नानही सर्वांच्या सहकार्याने चांगल्या प्रकारे पार पडतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी येथे व्यक्त केला. कुंभनगरीतील सेक्टर १ येथील उत्तरप्रदेश सरकारच्या ‘गंगा पंडाल’ येथे त्यांच्या हस्ते सांस्कृतिक कार्यक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
या कार्यक्रमांमध्ये आज प्रसिद्ध गायक शंकर महादेवन् यांची प्रस्तुती होती. यापुढे प्रत्येक दिवशी गायक महेश काळे, पार्वती बाऊल, सोनू निगम, मैथिली ठाकूर इत्यादी प्रसिद्ध गायकांचे कार्यक्रम आहेत. आज ओडीसी नृत्य कलाकारांनी नृत्य सादर केले. यापुढे प्रत्येक दिवशी भारतभरातील नृत्य कलाकार येथे त्यांची नृत्यकला सादर करतील.
या वेळी पत्रकारांशी बोलतांना एका पत्रकाराने महाकुंभामध्ये एका छावणीत समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचा पुतळा स्थापित केला असल्याविषयी प्रश्न विचारला. यावर उपमुख्यमंत्री मौर्य यांनी ‘असे वादग्रस्त विषय उपस्थित करू नये; कारण कुंभमेळ्याचे आयोजन हे संपूर्ण राज्याची नैतिक दायित्व आहे. सर्वांनी ‘अतिथी देवो भव’ या भावनेने प्रेरित व्हावे’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.