Prayagraj Mahakumbh 2025 : महाकुंभपर्वात भगवान परशुरामाची ५१ फूट उंचीची मूर्ती उभारली !

२० जानेवारीला पूजा करून मूर्तीचे अनावरण

प्रयागराज येथे सेक्टर क्रमांक ९ येथे भगवान परशुराम यांची ५१ फूट उंचीची मूर्ती स्थापित करण्यात आली आहे

प्रयागराज : येथे सेक्टर क्रमांक ९ येथे भगवान परशुराम यांची ५१ फूट उंचीची मूर्ती स्थापित करण्यात आली आहे. २० जानेवारी या दिवशी हिमाचल प्रदेशाचे राज्यपाल शिव प्रताप शुक्ला हे या मूर्तीची पूजा करणार आहेत. ‘राष्ट्रीय परशुराम परिषदे’चे संस्थापक आणि राज्य मंत्री सुनील भराला यांनी ही माहिती दिली. १५ जानेवारी या दिवशी सेक्टर ९ मधील बजरंग माधव मार्ग येथे ‘राष्ट्रीय परशुराम परिषदे’च्या छावणीत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

सुनील भराला पुढे म्हणाले की,

भगवान परशुराम यांची मूर्ती मंदिरे आणि घरे यांमध्ये स्थापित करण्यासाठी १ लाख ८ सहस्र मूर्ती वितरित केल्या जात आहेत. भगवान परशुराम यांचे दिव्य अस्त्र परशु आणि १ लाख ८ सहस्र श्री परशुराम चालीसा यांचे वाटप केले जाईल. ‘राष्ट्रीय परशुराम परिषदे’ने महाकुंभपर्वात २ लाख चौरस फुटांची छावणी उभारली आहे. या महोत्सवाच्या वेळी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आयोजित केले जातील. या कार्यक्रमात ४५ दिवसांचा अविरत आंतरराष्ट्रीय कथाकथन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असेल.