एकाच्या विरोधात गुन्हा नोंद

वैभववाडी – येथील पोलिसांनी भुईबावडा घाटात केलेल्या कारवाईत गोवंशियांची अवैधरित्या वाहतूक करणारे चारचाकी वाहन (टेंपो) १५ जानेवारीला पकडला. या प्रकरणी राजाराम उपाख्य राजू नारायण बनसोडे (रहाणार केरवडे, गगनबावडा, जिल्हा कोल्हापूर) याच्या विरोधात हत्या करण्याच्या उद्देशाने पशूंची अवैधरित्या वाहतूक केल्याच्या प्रकरणी गोहत्या प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या वेळी पोलिसांनी टेंपोतील ४ गोवंश (बैल) आणि टेंपो, असा ३ लाख ४० सहस्र रुपयांचा मुद्देमाल कह्यात घेतला.
गोहत्या बंदी कायदा राज्यात लागू असतांना गुरांची भरदिवसा वाहतूक करून त्यांना विकणार्या टोळ्या कार्यरत आहेत. अशा प्रकारे भुईबावडा घाटातून गुरांची विक्रीसाठी वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून कोल्हापूरला जाणारा एक टेंपो भुईबावडा घाटात अडवला आणि त्याची पडताळणी केली. या वेळी टेंपोत गोवंश असल्याचे पोलिसांना दिसले. हा टेंपो पोलिसांनी वैभववाडी पोलीस ठाण्यात आणला आहे. या गुन्ह्यात पकडलेले गोवंश वैभववाडी पोलिसांनी मूळ मालकांच्या कह्यात दिले आहेत.