१९ जानेवारीला पंचगंगा नदीवर अनंतकोटी ब्रह्मांडनायक स्वामींच्या नामस्मरण सोहळ्याचे आयोजन !

पत्रकार परिषदेत माहिती देतांना विविध स्वामीभक्त

कोल्हापूर, १६ जानेवारी (वार्ता.) – प्रतिवर्षीप्रमाणे यंदा १९ जानेवारीला स्वामीभक्त, स्वामीसेवक यांच्या वतीने पंचगंगा नदीच्या काठावर सायंकाळी ६ वाजता अनंतकोटी ब्रह्मांडनायक स्वामींच्या नामस्मरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात ८ सहस्रांपेक्षा अधिक आबालवृद्ध सहभागी होतात. या सोहळ्यात पंचगंगा नदीची आरती आणि ‘श्री स्वामी समर्थ’ नामजप सोहळा होईल. अत्यंत शिस्तबद्ध, भावमय वातावरणात पार पडणार्‍या या सोहळ्यात स्वामीभक्तांनी सहभागी व्हावे, असे आवाहन स्वामीसेवक अभिजित पाटील, अरुण गवळी, गुरुदेव स्वामी, बाळासाहेब राऊत, अभिषेक बागल, प्रथमेश माळी, अमित पाटील, धनंजय महिंद्रकर यांनी केले आहे.

या वर्षी श्री स्वामी समर्थ परंपरेतील स्वामींचे मानसपुत्र श्री स्वामीसूत महाराज यांच्या १५० व्या पुण्यतिथीच्या वर्षाच्या निमित्ताने नामस्मरण सोहळा समितीच्या निमित्ताने स्वामीसूत महाराजांची थोरवी मांडणारा आणि स्वामीसूत परंपरेतील साधूराय अन् साध्वी यांची माहिती देणारा देखावा साकारण्यात येणार आहे. याचाही भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन स्वामीभक्तांनी केले आहे.

पंचगंगा नदीवर होणार्‍या या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण अमेरिका येथे होणार असून कोल्हापूर येथील तंत्रज्ञ आणि स्वामीभक्त श्री. अभिजित पाटील यांनी त्या संदर्भातील सर्व तांत्रिक साहाय्य, तसेच समन्वय केला आहे. यामुळे अमेरिकेतील स्वामीभक्तांना तेथे बसून पंचगंगेची आरती, तसेच स्वामीनामाचा गजर ‘याची देही-याची डोळा’ पहावयास मिळणार आहे.