१५० हिरे आणि ८६ तोळे सोने जप्त

पुणे – ‘डिलिव्हरी बॉय’चे (वस्तू पोच करणारा व्यक्ती) कपडे परिधान करून शहरात घरफोड्या करणार्या टोळीतील गणेश काठेवाडे, सुरेश पवार यांच्यासह सराफी व्यावसायिक भीमसिंह उपाख्य अजय राजपूत यांना अटक केली आहे. आरोपींकडून १५० हिरे, ८६ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने, साडेतीन किलो चांदी, दुचाकी आणि पिस्तुल असा ८० लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. त्यांच्या विरोधात स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
टोळीचा मुख्य सूत्रधार गणेश काठेवाडे आणि साथीदार सुरेश पवार हे चोरी करायचे. गणेश हा ‘डिलिव्हरी बॉय’ म्हणून आधी सोसायटीमध्ये रेकी (पडताळणी) करायचा. त्या दोघांनी मिळून १४ घरे फोडली आहेत. या दोघांना यापूर्वीच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मकोका) अटक केली होती. दोघे जामीनावर बाहेर आल्यानंतर चोर्या करत होते. काठेवाडेवर यापूर्वी ५५ गुन्हे नोंद आहेत. (गुन्हेगारी पार्श्वभूमी असतांना त्याला जामीन का दिला ? असा प्रश्न कुणालाही पडेल. वारंवार गुन्हे करणार्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा देणे आवश्यक ! – संपादक) सुरेश पवार हा मुळशी तालुक्यातील अंबरवेड या गावचा माजी उपसरपंच आहे. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. (लोकप्रतिनिधी पुढे गुन्हेगार होणे हे गंभीर आहे ! – संपादक)
संपादकीय भूमिकापरत परत गुन्हे करणार्या गुन्हेगारांच्या वृत्तीमध्ये पालट होण्यासाठी त्यांना शिक्षेसह धर्मशिक्षण देणेही आवश्यक आहे ! |