प्रयागराज – महाकुंभपर्वात सेक्टर ६ मध्ये २.८ हेक्टर क्षेत्रात निर्माण करण्यात आलेली तिरुपती येथील बालाजीच्या मंदिराची भव्य प्रतिकृती सर्वांचे आकर्षण ठरत आहे. तिरुपती येथील बालाजीच्या मंदिराप्रमाणे ही हुबेहुब प्रतिकृती सिद्ध करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कुंभपर्वात या मंदिरात श्री बालाजीच्या सेवेसाठी तिरुपती देवस्थानातून २५० सेवकही आले आहेत. तिरुपती येथील मंदिराप्रमाणे कुंभपर्वातही श्री बालाजीचे यथासांग विधी केले जात आहेत.
या मंदिरामध्ये तब्बल ९ फूट उंचीची श्री बालाजीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. कुंभपर्वाच्या काळात बालाजी देवस्थानकरता शासनाकडून ५ हेक्टर भूमी देण्यात आली आहे. या भूमीवर श्री बालाजीच्या मंदिरासह सभामंडप, प्रसाद केंद्र, भगवंताच्या नैवेद्यासाठी भोजनशाळा आदी विभाग सिद्ध करण्यात आले आहेत. सिमेंट, स्टील, प्लायवूड यांचा वापर करून केवळ २८ दिवसांमध्ये या मंदिराचे निर्माण करण्यात आले आहे. या मंदिराच्या निर्माणासाठी १०० कारागिरांनी अहोरात्र सेवा केली. आंध्रप्रदेश, प्रयागराज आदी विविध भागांमध्ये मंदिराचे अवशेष सिद्ध करण्यात आले. तेथून कुंभपर्वाच्या ठिकाणी आणून या मंदिराची निर्मिती करण्यात आली. मंदिराच्या परिसरात एकाचवेळी २ सहस्र भाविक राहू शकतील, अशी माहिती तेथील अभियंत्यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला दिली.
असे आहे कुंभमेळ्यातील बालाजी मंदिर !

तिरुपती येथील श्री बालाजीचे मंदिर हे विविध राजांच्या कार्यकाळात बांधण्यात आले आहे. त्या राजांच्या काळातील कलाकृतीनुसार मंदिराच्या विविध भागांचे निर्माण करण्यात आले आहे. त्याचप्रमाणेच मंदिराची प्रतिकृती सिद्ध करण्यात आली आहे. जेणेकरून ज्या राजांनी मंदिरांचे निर्माण केले, त्यांचेही नागरिकांना स्मरण होईल. मंदिराच्या बाहेर ध्वजस्तंभही उभारण्यात आला आहे.
तिरूपती मंदिराप्रमाणे सर्व धार्मिक विधी !

सकाळी ६ वाजता भगवंताला फुले अर्पण केली जातात. याला ‘तोमाल’ म्हणतात. वैकुंठामध्ये ब्रह्मदेव श्री विष्णुंना तिथी सांगतात. त्याप्रमाणे मंदिरामध्ये मुख्य पंडित श्री बालाजीला तिथी आणि दिनविशेष सांगतात. या विधीला ‘कुलवू’ म्हणतात. त्यानंतर श्रीविष्णु सहस्रनामाद्वारे श्री बालाजीला तुलसीपत्रांचे अर्चन आणि भोग, म्हणजे नैवेद्य दाखवला जातो. दुपारी ४ वाजता भगवंतांला झुल्यावर झुलवले जाते. त्याला ‘उंजल’ सेवा म्हटले जाते. त्यानंतर भगवंताची शोभायात्रा काढली जाते. सायंकाळी ७ वाजता सायंपूजा आणि रात्री ८ वाजता रात्रीचा नैवेद्य दाखवला जातो.