आळंदी (पुणे) जवळील चिंबळी गावाच्या वस्तीत विनापरवाना चालू असलेले मशिदीचे अवैध बांधकाम तात्काळ थांबवण्यात यावे !

चिंबळी गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या बैठकीत ग्रामस्थांचा ठराव !

चिंबळी गावच्या ग्रामपंचायत बैठकीत उपस्थित ग्रामस्थ

आळंदी (जिल्हा पुणे), १६ जानेवारी (वार्ता.) – येथील चिंबळी गावाच्या बर्गे वस्ती येथे विनापरवाना एका मशिदीचे काम मोठ्या प्रमाणात चालू आहे. शासनाने चिंबळी गावात अशा बांधकामांना कोणत्याही परिस्थितीत अनुमती देऊ नये आणि अशी बांधकामे तात्काळ थांबवण्यात यावीत. यावर योग्य ती कारवाई ७ दिवसांत करावी. असे न झाल्यास ग्रामस्थ वेळप्रसंगी आंदोलन, रस्ता बंद इत्यादींचा अवलंब करतील. त्यानंतर आवश्यक असल्यास १५ दिवसांनी ग्रामस्थ पुन्हा विशेष ग्रामसभेची मागणी करतील आणि त्यानंतर हे अवैध बांधकाम ग्रामस्थ एकजुटीने येऊन पाडतील. पोलिसांनी सदर मशिदीच्या बांधकामास अनुमती देऊ नये, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

त्याच प्रमाणेच इतर शासकीय विभागाकडून म्हणजेच महसूल, वनविभाग, गृहविभाग आदींकडून या विषयाचे गांभीर्य ओळखून कार्यवाही होणे आवश्यक आहे, असे ठराव चिंबळी गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या बैठकीत करण्यात आले. या वेळी बहुसंख्येने चिंबळी गावाचे ग्रामस्थ उपस्थित होते.