विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी ‘अटल’ उपक्रम उपयुक्त !

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या परीक्षांचा सराव करता येणार

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई – विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी ‘अटल’ उपक्रम उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. १५ जानेवारी या दिवशी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र राज्य सीईटी सेल’कडून चालू करण्यात आलेल्या ‘अटल’ या ऑनलाइन नोंदणी प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी राज्य सामाईक परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई, सीईटी सेलचे घनश्याम केदार आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

‘शिक्षणातील संधी आणि क्षमता ओळखण्यासह विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून ‘अटल’ उपक्रम चालू करण्यात आला आहे. राज्य सामाईक प्रवेश कक्षाकडून घेण्यात येणार्‍या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी परीक्षांचा विद्यार्थ्यांना सराव करता यावा; म्हणून हा उपक्रम चालू करण्यात आला आहे’, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.