रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी शेतकर्‍यांच्या नावाने सहस्रो कोटी रुपयांचे कर्ज काढून शेतकर्‍यांची केली फसवणूक !

‘ईडी’कडून गंगाखेड, परभणी, बीड आणि धुळे येथील २५५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त !

रत्नाकर गुट्टे

परभणी – रासपचे गंगाखेड येथील आमदार रत्नाकर गुट्टे यांनी शेतकर्‍यांच्या नावे परस्पर सहस्रो कोटी रुपयांचे कर्ज उचलून ती रक्कम स्वतःच्या आस्थापनांमध्ये गुंतवली आहे. त्यामुळे आमदार गुट्टे यांच्या गंगाखेडसह परभणी, बीड आणि धुळे येथील २५५ कोटी रुपयांची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) कडून जप्त करण्यात आली आहे. २३ डिसेंबर या दिवशी मध्यरात्रीपासून ही कारवाई करण्यात येत आहे. (आमदार रत्नाकर गुट्टे हे भ्रष्टाचारी असल्याचे ठाऊक असूनही जनता त्यांना निवडून देते आणि नंतर ५ वर्षे ‘ते काहीही काम करत नाहीत’, अशी जनतेकडूनच ओरड केली जाते. याला काय म्हणावे ? असे लोकप्रतिनिधी आणि त्यांना निवडून देणारी जनता यांमुळेच लोकशाहीची निरर्थकता दिसून येते. – संपादक)

१. परभणी जिल्ह्यातील ‘गंगाखेड शुगर्स अ‍ॅण्ड एनर्जी लिमिटेड’ या साखर कारखान्याच्या माध्यमातून आमदार रत्नाकर गुट्टे यांनी शेकडो शेतकर्‍यांच्या नावावर परस्पर कर्ज घेतले. कर्जाची रक्कम त्यांनी गंगाखेड शुगर एनर्जी लिमिटेडच्या माध्यमातूनच धुळे जिल्ह्यातील ‘योगेश्‍वरी हॅचरीज’ आणि गंगाखेड येथील ‘गंगाखेड सोलार पॉवर लिमिटेड’सह इतर आस्थापनांमध्ये गुंतवली आहे.

२. तक्रार प्रविष्ट झाल्यावर ‘ईडी’ने केलेल्या कारवाईत ‘गंगाखेड शुगर अ‍ॅण्ड एनर्जी लिमिटेड’चे २४७ कोटी किमतीचे यंत्र, ५ कोटी रुपयांची भूमी, धुळे जिल्ह्यातील ‘योगेश्‍वरी हॅचरीज’, तर ‘गंगाखेड सोलार पॉवर लिमिटेड’च्या परभणी, बीड आणि धुळे येथील अधिकोषांमध्ये असलेल्या अनुमाने दीड कोटी रुपये किमतीची गुंतवणूक आणि गंगाखेड शुगर्स लिमिटेडचे १ कोटी ९० लाख रुपये किमतीचे समभाग, अशी एकूण २५५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

३. शेतकर्‍यांच्या नावे १० सहस्र कोटी रुपयांहून अधिक कर्ज परस्पर उचलल्याचा आरोप आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यावर आहे. तत्कालीन गंगाखेडचे आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे यांनी या प्रकरणी पुराव्यानिशी तक्रार दिली होती.

४. हा प्रश्‍न सामाजिक न्यायमंत्री तथा तत्कालीन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधानसभेत मांडून आमदार गुट्टे यांच्यावर कारवाईची मागणीही केली होती.

कारागृहात राहून रत्नाकर गुट्टे यांनी जिंकली विधानसभेची निवडणूक

 शेतकर्‍यांची फसवणूक करणारे विधानसभेच्या निवडणुकीत निवडून कसे येतात ? जनताही त्यांना निवडून कशी देते ? उलट अशा लोकप्रतिनिधींना कायमची अद्दल घडवण्यासाठी जनतेने त्यांचा पराभव करायला हवा !

शेतकर्‍यांच्या नावाने परस्पर कोट्यवधींचे कर्ज घेतल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले आमदार रत्नाकर गुट्टे यांनी कारागृहातूनच वर्ष २०१९ मध्ये गंगाखेड विधानसभेची निवडणूक लढवली आणि ते जिंकले. २६ मार्च २०१९ या दिवशी रत्नाकर गुट्टे यांना संभाजीनगर येथील राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) पथकाने अटक करून गंगाखेड येथील कनिष्ठ न्यायालयात उपस्थित केले होते. यानंतर हे प्रकरण बरेच दिवस संभाजीनगर उच्च न्यायालयात चालले. तिथे त्यांना जामीन मिळाला नाही. शेवटी उच्च न्यायालयातून त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आणि तिथेही अनेक दिनांकानंतर त्यांना ५ मार्च २०२० या दिवशी जामीन मिळाला आहे. ते अनुमाने वर्षभर कारागृहात राहिले.