पारनेर (जिल्हा नगर) तालुक्यातील ३० ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध करण्याचा ग्रामपंचायतींचा निर्णय

आमदार नीलेश लंके यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार नीलेश लंके यांच्याप्रमाणे इतर गावांतील लोकप्रतिनिधी असे आवाहन करतील का ?

नीलेश लंके

नगर – नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात गावात वादविवाद, भांडण होऊ नये, यासाठी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा आणि गावाच्या विकासासाठी २५ लाख रुपये घेऊन जा, असे आवाहन ग्रामस्थांना केले. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत पारनेर तालुक्यातील ३० ग्रामपंचायतींनी निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. एवढेच नव्हे, तर आणखी १० ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध करणार असल्याचा विश्‍वास आमदार लंके यांनी व्यक्त केला आहे.

(आमदार नीलेश लंके यांच्याप्रमाणे राज्यातील इतर जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधींनी असे आवाहन करून ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध लढवल्यास त्यात होणारे कोट्यवधी रुपये वाचून ते गावांच्या विकासकामांसाठी वापरता येतील. – संपादक)


१. आमदार नीलेश लंके यांनी केलेल्या आवाहनाला सर्वांत पहिले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी ग्रामपंचायतीने प्रतिसाद दिला आहे. राळेगणसिद्धी गावात अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.

२. गावात २ गट असतांनाही गावातील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

३. त्यानंतर ३० ग्रामपंचायतींनी बिनविरोध निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने पारनेर तालुक्यात अनेक ग्रामपंचायती बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

४. ‘प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, एकोपा टिकवण्यासाठी सर्व घटकांना समान न्याय देऊन आपली ग्रामपंचायत बिनविरोध करा. तुमच्या सर्वांगीण विकासाचे दायित्व माझे असेल’, असेही आवाहन लंके यांनी फेसबूकवर केले होते.

५. संपूर्ण राज्यात येत्या १५ जानेवारी २०२१ पासून राज्यातील १४ सहस्र २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत.