बिहारच्या लोकगायिका मैथिली ठाकूर यांचा हिंदी चित्रपटसृष्टीत गाण्यास नकार

सामाजिक माध्यमांतून कौतुकाचा वर्षाव !

देवाने दिलेली कला ही केवळ त्यालाच समर्पित केल्यास त्यातून आध्यात्मिक उन्नती होते. त्याचा वापर भौतिक प्राप्तीसाठी केल्यास व्यवहारिक प्रगती होते !

लोकगायिका मैथिली ठाकूर

पाटलीपुत्र (बिहार) – येथील २० वर्षीय प्रसिद्ध लोकगायिका मैथिली ठाकूर यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत गाण्यास नकार दिला आहे. ‘मी लोकगायिका असल्याने पारंपारिक गायनच चालू ठेवणार आहे’, असे त्यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे. यानंतर त्यांचे सामाजिक माध्यमांतून मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे.

१. प्रसिद्ध लेखिका शेफाली वैद्य यांनी ट्वीट करून म्हटले, ‘हे मोठे पाऊल आहे. या मुलीचा मी पुष्कळ सन्मान करते. मैथिलीचा मला गर्व आहे.’

२. राहुल कुमार नावाच्या एका युजरने ट्वीट करून म्हटले, ‘मैथिली यांनी हिंदु धर्म आणि राष्ट्र यांचे अयोग्य आणि अपकीर्ती करणारे चित्रण करणार्‍या हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये गाण्यास नकार दिला, याचा आम्हाला गर्व आहे.’