परात्पर गुरु डॉ. आठवले हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संमोहन उपचारतज्ञ होते. रुग्णांवर उपचार करून त्यांना बरे करण्यात आधुनिक विज्ञानाला असलेल्या मर्यादा लक्षात आल्यावर त्यांनी अध्यात्माचा अभ्यास चालू केला. परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्या मार्गदर्शनानुसार साधना केली. गेली ४० वर्षे ते जगभरातील साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करत आहेत. परात्पर गुरु डॉक्टर ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’ या संस्थेचे प्रेरणास्रोत आहेत. त्यांनी जगभरात अध्यात्माचा प्रसार करण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ची स्थापना केली आहे. या विश्वविद्यालयाकडून गोवा, भारत येथील आध्यात्मिक संशोधन केंद्रात ५ दिवसांच्या आध्यात्मिक कार्यशाळा आयोजित करण्यात येतात. या कार्यशाळांचा उद्देश ‘जिज्ञासूंना साधनेच्या प्रायोगिक अंगाविषयी माहिती देऊन त्यांच्या साधनेला गती देणे’, असा आहे. परात्पर गुरु डॉक्टरांनी या कार्यशाळांना उपस्थित असलेल्या जिज्ञासूंना केलेले मार्गदर्शन पुढे दिले आहे.
(भाग १)
१. साधना
१ अ. अध्यात्मातील तात्त्विक माहिती प्रत्यक्ष आचरणात आणल्याविना अध्यात्म समजून घेता येत नाही !
सौ श्वेता क्लार्क : कार्यशाळेच्या कालावधीत आम्हाला ‘आग्रा येथील कु. मिल्की अगरवाल यांच्यात पुष्कळ जिज्ञासा आणि शिकण्याची वृत्ती आहे’, असे लक्षात आले.
परात्पर गुरु डॉ. आठवले : जिज्ञासा केवळ अध्यात्माचा तात्त्विक भाग जाणून घेण्यापुरती मर्यादित नको. तात्त्विक भाग प्रत्यक्ष आचरणात आणायला हवा. तेव्हा तुम्हाला खर्या अर्थाने सर्व समजेल. त्यामुळे कार्यशाळेत आम्ही अध्यात्माचा तात्त्विक भाग फारसा न शिकवता प्रायोगिक भाग शिकवतो.
१ आ. साधनेचा उद्देश
१ आ १. अर्धवट निद्रावस्थेत देवाला अनुभवणे आणि सतत देवाच्या अनुसंधानात रहाण्याचा प्रयत्न करणे, हे साधनेचा पाया चांगला असल्याचे निर्देशक आहे !
सौ श्वेता क्लार्क : श्रीमती मामी सुमगरी यांना साधारण एक वर्षापूर्वी अर्धवट झोपेत असतांना एक अनुभूती आली. त्यांना एका चांगल्या शक्तीचे अस्तित्व जाणवले. त्या वेळी त्यांच्या मनात ‘तो देव असावा’, असा विचार आला. तेव्हा त्यांना साधनेविषयी विशेष काही ठाऊक नव्हते. ही अनुभूती काहीच क्षण टिकली; पण नंतर ‘ही अनुभूती पुन्हा यावी’, असे त्यांना वाटू लागले.
परात्पर गुरु डॉ. आठवले : तुम्ही साधना करायला आरंभ करा. तुम्हाला ही अनुभूती जागेपणीही येईल. बाह्यमनात पुष्कळ विचार चालू असतात. अर्धवट झोपेच्या स्थितीत बाह्यमन कार्यरत नसते. अशा वेळी तुमचे देवाशी अनुसंधान होऊ शकते. दिवसातील २४ घंटे देवाच्या अनुसंधानात रहाता येण्यासाठी आपण साधना करतो. मामींना आलेली अनुभूती अतिशय चांगली असून ती त्यांच्या साधनेसाठी उत्तम पाया आहे.
(क्रमशः)
भाग २. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/429723.html
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |