परात्पर गुरु डॉक्टर ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’ या संस्थेचे प्रेरणास्रोत आहेत. त्यांनी जगभरात अध्यात्माचा प्रसार करण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ची स्थापना केली आहे. या विश्वविद्यालयाकडून गोवा, भारत येथील आध्यात्मिक संशोधन केंद्रात ५ दिवसांच्या आध्यात्मिक कार्यशाळा आयोजित करण्यात येतात. या कार्यशाळांचा उद्देश ‘जिज्ञासूंना साधनेच्या प्रायोगिक अंगाविषयी माहिती देऊन त्यांच्या साधनेला गती देणे’, असा आहे. परात्पर गुरु डॉक्टरांनी या कार्यशाळेतील जिज्ञासूंना केलेले मार्गदर्शन पुढे दिले आहे.
लेखाचा भाग १ पहाण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. – https://sanatanprabhat.org/marathi/429155.html
(भाग २)
१. साधना
१ आ २. प्रत्येक प्रसंगात आध्यात्मिक दृष्टीने विचार करणे आणि इतरांना साधनेविषयी मार्गदर्शन करणे, हा देवाच्या जवळ जाण्याचा राजमार्ग आहे !
श्री. शॉन क्लार्क : श्री. ट्रंग वेन यांचे स्वतःचे दुकान आहे. लोक यांच्या दुकानात येतात आणि काही वेळा तेथील बाटली उचलून भूमीवर फेकतात अथवा यांसारख्या काही कृती करतात. अशा प्रसंगाच्या वेळी ट्रंग यांचा दृष्टीकोन ‘आता मी अधिकाअधिक नामजप करायला हवा’, असा असतो.
परात्पर गुरु डॉ. आठवले : ते आध्यात्मिक स्तरावरचे विचार करत आहेत आणि ते महत्त्वाचे आहे. त्याउलट जर ते मानसिक वा बौद्धिक पातळीवर असते, तर असे प्रसंग घडत असतांना त्यांच्या मनात ‘आता मी काय करू ? दुकानात छायाचित्रक (कॅमेरा) बसवून घेऊ का ? अथवा पोलिसांकडे गार्हाणे करू का ?’, यांसारखे विचार आले असते. ‘वेन तुम्ही जलद गतीने आध्यात्मिक प्रगती करा. अमेरिका तुमची वाट पहात आहे.’
श्री. ट्रंग वेन : अमेरिकेतील जवळजवळ ८० टक्के लोक निराशेत आहेत.
परात्पर गुरु डॉ. आठवले : अमेरिकेतील लोकांना साहाय्याची पुष्कळ आवश्यकता आहे. ते लोक मनोरुग्ण झाले आहेत. या लोकांमध्ये निराशा, अती चिंता आणि इतर मानसिक आजार आहेत. तेथील ८० टक्के लोकांना मानसोपचारांची आवश्यकता आहे; पण तुम्ही (श्री. ट्रंग) अमेरिकेत जाल, तेव्हा त्यांना मानसोपचारतज्ञांची आवश्यकता भासणार नाही. तुम्हाला लोकांना अध्यात्म शिकवावे लागेल आणि त्याचा समाजात प्रसार करावा लागेल, जेणेकरून त्या लोकांचेही जीवन आनंदी होईल. तुम्ही समाजाला अध्यात्म शिकवण्याचे त्याचे (देवाचे) कार्य करत असल्यामुळे देवाला तुम्ही जवळचे वाटू लागाल. अध्यात्मविषयी केवळ जाणून घेणे आणि घरात बसून ध्यान करणे, हा स्वार्थीपणा आहे. इतरांना साधना शिकवल्यास आपल्यात व्यापकत्व येते.
१ आ ३. स्वतःच्या आवडी-निवडी बाजूला ठेवून परेच्छेने वागणे, हे ईश्वरेच्छेने वागण्याच्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल आहे !
सौ. श्वेता क्लार्क : सौ. योगिताताईंच्या सेवेत आवडी-निवडी नसतात. त्यांना एखादी सेवा दिल्यावर त्या कधीही ‘ही सेवा नको’ अथवा ‘मला ही सेवा जमणार नाही’, असे म्हणत नाहीत.
परात्पर गुरु डॉ. आठवले : त्या (सौ. योगिता) आवडी-निवडींच्या पलीकडे गेल्या आहेत. प्राथमिक टप्प्यावर स्वतःचे विचार असतात. आपल्याला तेच खरे वाटतात आणि आपण त्याप्रमाणे वागतो. पुढचा टप्पा ‘इतरांचे ऐकणे’ हा असतो. सौ. योगिता ‘इतरांचे ऐकणे’ या टप्प्याला आहेत. याच्या पुढे गेल्यावर तुम्ही ‘देवाला जे अपेक्षित आहे’, ते सहजपणे करू शकाल. त्या अवस्थेत खर्या अर्थाने तुम्ही ईश्वराच्या अनुसंधानात असाल.
(क्रमश:)
भाग ३. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/430006.html
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |