दोषी लोकप्रतिनिधींवर आजीवन बंदी घालण्याचा नियम नाही !

केंद्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

  • गुन्हेगार लोकप्रतिनिधींवर आजन्म बंदीचा नियम नसेल, तर तो सरकारने आता करणे आवश्यक आहे. तरच भारतीय लोकशाही अधिक स्वच्छ होईल आणि राजकारणाचे गुन्हेगारीकरण अल्प होण्यास साहाय्य होईल ! यासाठी सरकारने इच्छाशक्ती दाखवण्याची आवश्यकता आहे, असेच जनतेला वाटते !

  • राजकारण्यांनी कितीही गुन्हे करून शिक्षा भोगली, तरी ते पुन्हा राजकारणात येऊ शकतात, हे लज्जास्पद !

नवी देहली – गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये दोषी ठरलेल्यांना निवडणूक लढवण्यास आजीवन बंदी घालावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे. यावर केंद्र सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगण्यात आल्यावर सरकारने ‘अशी बंदी घालण्याचा नियम नाही’, असे म्हटले आहे. सध्याच्या कायद्यानुसार कारावास झाल्यानंतर पुढील ६ वर्षे निवडणूक लढवण्यावर बंदी आहे.

सरकारी अधिकार्‍यांवर आजीवन बंदी, तर राजकारण्यांवर का नाही ? – अधिवक्ता अश्‍विनी उपाध्याय

भाजपचे नेते आणि अधिवक्ता अश्‍विनी उपाध्याय यांनी ही याचिका केली आहे. त्यांनी यात म्हटले आहे की, सरकारी नोकरी करणारा एखादा अधिकारी दोषी आढळल्यास त्याच्यावर आजीवन बंदी घातली जाते. असे असतांना राजकारण्यांसाठी एक न्याय आणि सरकारी अधिकार्‍यांसाठी वेगळा न्याय का ? असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला आहे.

सरकारी अधिकार्‍यांप्रमाणे राजकारण्यांना नियम नाहीत ! – केंद्र सरकार

केंद्र सरकारने यावर न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, सरकारी काम करणार्‍यांप्रमाणे लोकांमधून निवडून येणार्‍या लोकप्रतिनिधींच्या सेवेसाठी कोणत्याही अटी घालण्यात आलेल्या नाहीत. त्याचप्रमाणे राजकारणी हे जनतेचे सेवक असले, तरी त्यांच्या सेवेसंदर्भात कोणतेही ठोस नियम नाहीत. लोकप्रतिनिधी हे त्यांनी घेतलेल्या प्रतिज्ञेला बांधील असतात. या प्रतिज्ञेनुसार लोकप्रतिनिधींनी त्यांच्या मतदारसंघातील आणि देशातील जनतेची सेवा करणे अपेक्षित असते. लोकप्रतिनिधींनी देशाची भरभराट होण्यासाठी, चांगल्या हेतूने आणि देशाच्या हितासाठी काम करणे अपेक्षित आहे. सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी घालून दिलेली मार्गदर्शक तत्त्वे आणि निकाल यांच्या संदर्भाप्रमाणेच लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदीनुसार लोकप्रतिनिधींवर बंदी घातली जाते.