मालवण तालुक्यात लेप्टोच्या रुग्णसंख्येत वाढ

मालवण – तालुक्यात काही प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे, तर दुसरीकडे लेप्टोस्पायरोसिसचे (लेप्टोचे) रुग्ण वाढत आहेत. मागील ८ दिवसांत तालुक्यात ६ रुग्ण आढळले आहेत. यामुळे आरोग्ययंत्रणा सतर्क बनली आहे.

गत ३ वर्षांत ज्या गावांत लेप्टोचे रुग्ण सापडले होते, ती गावे जोखीमग्रस्त म्हणून घोषित केली जातात. तालुक्यातील अशी २८ गावे असून तेथे प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. उंदीर आणि अन्य प्राण्यांचे मलमूत्र शेतातील पाण्यात मिसळते. शेतात काम करणार्‍या व्यक्तीला जखम झाली असल्यास दूषित पाण्याद्वारे जखमेतून ‘लेप्टो’चे विषाणू मानवी शरिरात प्रवेश करतात. त्यानंतर ताप आणि अन्य लक्षणे दिसून येतात. अशी लक्षणे दिसणार्‍या रुग्णांनी प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा मालवण ग्रामीण रुग्णालय येथे संपर्क करावा आणि तात्काळ तपासणी करून घ्यावी. तालुक्यातील काळसे, चिंदर, राठीवडे, असरोंडी, धामापूर आणि शिरवंडे या गावात प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. या सहाही रुग्णांवर उपचार चालू आहेत. शेतीचे काम करणार्‍या ग्रामस्थांनी अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कुबेर मिठारी यांनी केले आहे.