संपादकीय : अतीशहाण्यांचा बैल रिकामा !

आय.आय.टी. मद्रास’चे संचालक व्ही. कामकोटी आणि काँग्रेसचे खासदार कार्ती चिदंबरम्

‘आय.आय.टी. मद्रास’चे संचालक व्ही. कामकोटी यांनी ‘गोमूत्राचे औषधी गुणधर्म जाणून त्यामुळे मनुष्याला आरोग्यासाठी कोणते लाभ होऊ शकतात’, याविषयी ‘पोंगल’च्या निमित्ताने आयोजित केलेल्या गायींच्या संवर्धन कार्यशाळेत सांगितले.  त्यांच्या या विधानाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाल्यावर पुरो(अधो)गाम्यांना म्हणा किंवा तथाकथित विज्ञानवाद्यांना पोटशूळ उठला नसता, तरच नवल होते; पण हे नवल पहायला मिळाले नाही आणि काँग्रेसचे खासदार कार्ती चिदंबरम् यांनी व्ही. कामकोटी यांच्या कार्यशाळेतील विधानावर आक्षेप घेत ‘ते बनावट विज्ञानाला प्रोत्साहन देत आहेत’, अशी टीका केली. ‘गोमूत्रात विषाणू आणि बुरशी यांच्याविरोधी गुणधर्म आहेत. या व्यतिरिक्त ते पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी आणि ‘इरिटेबल बोवेल सिंड्रोम’सारख्या (जठराच्या संदर्भातील आजार) पचन समस्यांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते’, असे व्ही. कामकोटी यांनी सांगितले होते. कामकोटी यांनी जे सांगितले, ते बनावट विज्ञान आहे, हे कार्ती चिदंबरम् यांना कसे कळले ? ते संशोधक आहेत का ? कुठल्या आधारावर त्यांनी ही टीका केली ? व्ही. कामकोटी हे मद्रास येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे संचालक आहेत. त्यांनी मोठ्या प्रमाणातील ‘इंटिग्रेटेड सर्किट्स’, ‘कॉम्प्युटर आर्किटेक्चर’, ‘एम्बेडेड सिस्टम्स’ आदींवर संशोधन केले आहे. ते एक संशोधक आहेत, त्यामुळे त्यांच्या क्षेत्रातील गोष्टींच्या व्यतिरिक्त अन्य क्षेत्रातील गोष्टींकडेही जिज्ञासू आणि संशोधक वृत्तीने पहाण्याचा गुण त्यांच्यात असणार. त्यामुळे गोमूत्राविषयीही त्यांनी जिज्ञासू वृत्तीने काही प्रयोग करून त्यांचा अनुभव मांडला असणार. कामकोटी यांच्या विधानाविषयी शंका असल्यास ‘कामकोटी यांनी कोणत्या आधारावर गोमूत्राच्या लाभाविषयी विधान केले ?’, असे त्यांना संयतपणे विचारता आले असते; परंतु कार्ती चिदंबरम् यांनी अन्य पुरो(अधो)गाम्यांप्रमाणेच स्वतः सर्वज्ञानी असल्याप्रमाणे म्हणजेच अतीशहाण्याप्रमाणे ‘व्ही. कामकोटी हे बनावट विज्ञानाला प्रोत्साहन देत आहेत. त्यांचे हे विधान लज्जास्पद आहे. आय.आय.टी. या प्रतिष्ठित संस्थेसाठी अयोग्य आहे’, असे सांगून थयथयाट चालू केला.

अनुभव किंवा अनुभूतीच श्रेष्ठ !

स्वतःला विज्ञानवादी म्हणवणार्‍या या पुरोगाम्यांचे ‘ब्रेनवॉश’ (बुद्धीभेद) झालेले असते, म्हणजे ‘त्यांना ज्ञात असलेल्या विशिष्ट गोष्टीच योग्य’, असा त्यांचा ठाम विश्वास असतो. त्याच्या पलीकडे जर कुणी काही करत असेल, तर ते जाणून घेण्याचीही त्यांना आवश्यकता वाटत नाही. खरे तर विज्ञानातील काही सिद्धांतही विविध प्रयोग आणि ते यशस्वी होण्याची वारंवारता यानंतरच स्वीकारले जातात; परंतु तथाकथित विज्ञाननिष्ठांना नवीन काहीही जाणून घेण्याची इच्छा नसते. त्यांना तेवढा संयमही नसतो. व्ही. कामकोटी यांनी गोमूत्राच्या लाभाविषयीचे विधान करतांना एका व्यक्तीला गोमूत्र प्यायल्यावर आलेला अनुभव सांगितला होता. हा अनुभव म्हणजे परिणाम असतो. आता या अनुभवात जर वारंवारता असेल, अनेक जणांना गोमूत्र प्यायल्यावर चांगला अनुभव येत असेल, तर गोमूत्राचे लाभ मान्य करण्यात चूक काय ? विज्ञानवाद्यांनी स्वतःला एका कोषात जखडून घेतले आहे. त्या पलीकडे जे काही घडते, ते वैज्ञानिक संज्ञेत बसत नाही, असे त्यांना वाटायला लागले की, मग ते ‘खोटे आहे, छद्म आहे, अवैज्ञानिक आहे, चुकीचे आहे, अयोग्य आहे’, अशी टीका करायला प्रारंभ करतात. मनुष्याला एखादी गोष्ट केल्यावर जेव्हा चांगला अनुभव येतो, तेव्हा तो ‘ती गोष्ट वैज्ञानिक संज्ञेत बसते का ?’, हे पहात बसत नाही, तर तशी कृती पुनःपुन्हा करतो; कारण त्यामुळे त्याला चांगला अनुभव आलेला असतो. हे साधे तर्कशास्त्रही (लॉजिकही) स्वतःला विज्ञाननिष्ठ म्हणवणारे हे अतीशहाणे वापरत नाहीत. याच कारणामुळे हे तथाकथित विज्ञाननिष्ठ अध्यात्मशास्त्रावरही टीका करतात; कारण अध्यात्म हे बुद्धीपलीकडील, म्हणजे अनुभूतींचे शास्त्र आहे. अध्यात्माकडे विज्ञानाच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास त्यावर कसा विश्वास बसणार ? त्यासाठी साधना करून, म्हणजेच अध्यात्मशास्त्राप्रमाणे कृती करून अनुभूतीच घ्यायला हवी !

तथाकथित विज्ञाननिष्ठांनी ‘बुद्धीच्या पलीकडेही जग आहे’, हे जाणून घेण्यासाठी त्यांची बुद्धी वापरली, तर जगाचे भले होईल !