राजकारण म्हणून ‘हिंदुत्व’ करू नका  ! –  उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई – ‘लव्ह जिहाद’ विरोधात आम्ही कायदा करू; मात्र गोहत्याबंदी कायदा गोवा, काश्मीर, तसेच ईशान्येकडील भाजपशासित राज्ये येथे का करण्यात आलेला नाही ? केवळ निवडणुकीचा विषय करून निवडणूक लढवायची आणि मते मिळाली की, कायदा करायचा. असे सोयीचे हिंदुत्व आम्ही केले नाही. राजकारण म्हणून ‘हिंदुत्व’ करू नका, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. महाविकास आघाडीचे शासन स्थापन होऊन १ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दैनिक ‘सामना’चे संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा करण्याविषयी विचारलेल्या प्रश्‍नाला त्यांनी वरील उत्तर दिले.

या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले,

१. हिंदुत्व हे धमन्यांमध्ये असावे लागते. धमन्यांमध्ये भिनलेली गोष्ट सोडू शकत नाही.

२. वीजदेयके एकदम आल्यामुळे त्यांची रक्कम वाढली आहे. जेथे तक्रारी आल्या, तेथे वीजमंडळाच्या कर्मचार्‍यांनी पडताळणी केली आहे. तरीही आम्ही हा विषय सोडलेला नाही.

३. मुंबई महानगरपालिकेच्या भोवती आमची भक्कम तटबंदी आहे. ज्यांना लढाई करायची खुमखुमी असेल, त्यांनी डोके आपटून बघावे. मुंबई महापालिका शिवसेनेकडेच येईल.

४. केंद्रीय अन्वेषण यंत्रणा, अंमलबजावणी संचालनालय यांचा दुरुपयोग केल्यास आमच्याकडेही मालमसाला आहे; पण आम्हाला सूडाचे राजकारण करायचे नाही.

५. महाराष्ट्रात ‘ऑनलाईन’ शिक्षण चालू करण्यात आले आहे, त्याप्रमाणे देशभरात शिक्षणाचे समान धोरण निश्‍चित करावे.