मुंबईतील समुद्रकिनार्‍यांवर छठ पूजेला यंदा बंदी – मुंबई महापालिकेचा निर्णय

मुंबई – कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई महापालिकेने समुद्रकिनार्‍यावर छठ पूजेला बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसच्या संजय निरूपम यांनी या वर्षी घरीच छठ पूजा साजरी करण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, ‘‘छठ पूजा अवश्य साजरी करा; पण सार्वजनिक ठिकाणी आणि समुद्रकिनार्‍यावर गर्दी करून साजरी करू नका. तुमच्या परिसरात विहीर, तलाव असेल किंवा इमारतीत, घरात छठची व्यवस्था करून पूजा करा. कोरोनाचा संसर्ग किती वाढू शकेल, याचा अंदाज लावता येणार नाही. याचा परिणाम सर्वसामान्य मुंबईकरांवर होऊ शकतो.’’

मुंबईतील समुद्रकिनार्‍यांवर छठ पूजेला बंदी हे सरकारचे हिंदुविरोधी कृत्य ! – भाजप

या संदर्भात अतुल भातखळकर म्हणाले, ‘‘मी स्वत: मुख्यमंत्र्यांकडे छठ पूजा करण्यासाठी अनुमती मागितली होती; परंतु ऐन दिवाळीत वक्फ बोर्डाचे भाडे कोट्यवधीने वाढवले. मंदिरे सर्वांत विलंबाने उघडली आणि आता छठ पूजेलाही अनुमती नाकारली आहे. सरकार आणि मुंबई महापालिका हे हिंदुविरोधी काम करत आहे.’’