दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर भाविकांनी घेतले स्वामी समर्थांचे दर्शन
अक्कलकोट – महाराष्ट्र शासनाने दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरे उघडण्याचे जाहीर केल्यानंतर येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे श्री स्वामी समर्थांचे मंदिरही १६ नोव्हेंबरपासून उघडण्यात आले.
८ मासांपासून स्वामींच्या दर्शनासाठी आतुरलेल्या भाविकांनी पहाटेपासूनच स्वामींच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी रांगा लावल्या होत्या. भाविकांनी स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्यानंतर काही भाविकांना भावाश्रू आले. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे, मंदार पुजारी यांच्या हस्ते पहाटे ५ वाजता मंदिराचा दरवाजा उघडण्यात आला.
मंदिर उघडल्यानंतर स्थानिक नागरिकांसह अन्य जिल्ह्यांतून आलेल्या नागरिकांनी स्वामींचे दर्शन घेत समाधान आणि आनंद व्यक्त केला. एका घंट्यात १०० भाविक दर्शन घेऊन सुखरूप बाहेर पडतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिर समितीच्या वतीने परिसरात ‘सॅनिटायझर’ची सोय केली आहे. भाविकांना मंदिरात प्रवेश करतांना ‘मास्क’ आणि ‘सॅनिटायझर’ यांचा वापर करण्याविषयी सांंगण्यात येत आहे. या प्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, संजय पवार, श्रीशैल गवंडी, कल्याणशेट्टी आणि इंगळे कुटुंंबिय यांसह अनेक भाविक उपस्थित होते.