भारतात पारंपरिक भारतीय औषधांचे जागतिक केंद्र उभारणार ! – जागतिक आरोग्य संघटना

नवी देहली – भारतीय पारंपरिक औषधांचे एक जागतिक केंद्र प्रारंभ करण्याची घोषणा जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस घेब्रेयेसस यांनी केली. भारतातच हे केंद्र स्थापन केले जाणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी जयपूर आणि जामनगर येथे चालू करण्यात आलेल्या आयुर्वेद संस्थांचे ऑनलाईन उद्घाटन करतांना डॉ. घेब्रेयेसस बोलत होते.

१. डॉ. घेब्रेयेसस म्हणाले की, भारतात आम्ही हे नवे केंद्र स्थापन करून त्याद्वारे या पारंपरिक औषध पद्धतीचे संशोधन, प्रशिक्षण आणि जनजागृती यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करणार आहोत. जागतिक आरोग्य संघटनेने वर्ष २०१४ ते २०२३ या काळासाठी पारंपरिक औषधांच्या संबंधात जे धोरण आखले आहे, त्याला बळकटी देण्याचे काम भारतातील या केंद्राकडून होईल.

२. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आयुर्वेद ही भारताची प्राचीन मौलिक संपत्ती आहे. हा एक समृद्ध वारसा आहे. त्याचा प्रसार झाला, तर त्यातून मानवतेचे कल्याणच होणार आहे. भारताची ही प्राचीन वैद्यकीय पद्धत अन्य देशांतही अवलंबली जाणार असेल, तर त्याचा भारतीय नागरिकांनाही अभिमान वाटल्याविना रहाणार नाही.