नवी मुंबई – २२ मार्चपासून बंद असलेली मुंबई कृषी उत्त्पन्न बाजार समितीमधील पाचही बाजारपेठा कोकण आयुक्त शिवाजीराव दौंड यांच्या मध्यस्थीनंतर २६ मार्चपासून प्रायोगिक तत्त्वावर चालू करण्यात आल्या. कोकण आयुक्तांच्या उपस्थितीत बाजारात येणार्या गाड्यांवर निर्जंतुकीकरण फवारणी करणे, चालक, साहाय्यक, बाजारपेठेत येणारे ग्राहक, माथाडी कामगार, व्यापारी आदी घटकांना ‘मास्क’ देणे, पाणी आणि ‘सॅनिटायझर’ने हात धुणे, प्रत्येकाच्या शरिराचे तापमान यंत्राने पडताळणे, शेतमाल ठेवण्याच्या जागांसह सर्व बाजारपेठांचे निर्जंतुकीकरण करणे, मुंबईतून आलेले खरेदीदार आणि त्यांचे वाहन यांचे निर्जंतुकीकरण करणे, आदी सर्व सुरक्षेच्या उपाययोजना राबवल्या. त्यानंतर २६ गाड्या भाजीपाला, ३० कांदा-बटाट्याच्या गाड्या, फळे, अन्नधान्य आणि मसाला यांच्याही अत्यल्प गाड्या मुंबईत पाठवण्यात आल्या.
कोरोना विषाणूच्या प्रदूषणामुळे बाजार समिती प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याचे कारण पुढे करत व्यापार्यांनी ३१ मार्चपर्यंत बाजार चालू करणार नाही, अशी भूमिका घेतली होती. याविषयी बाजार समिती प्रशासन आणि पणन संचालनालय यांच्याकडून गेली तीन दिवस व्यापार्यांच्या बैठका घेऊन बाजार चालू करण्याच्या संदर्भात चर्चा केली जात होती. अखेर बाजारपेठा चालू करण्यास प्रशासनाला यश आले आहे.