नवी मुंबईत विदेशातून आलेल्या प्रवाशांसह २८५ जणांचे अलगीकरण

नवी मुंबई, २४ मार्च (वार्ता.) – कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विदेशी प्रवाशांसह अद्याप २८५ जणांचे अलगीकरण करण्यात आले आहे.

१. विदेशातून भारतात आलेल्या नवी मुंबईतील प्रवाशांना १४ दिवस अलगीकरण (क्वारंटाईन) कक्षात ठेवण्याची सुविधा वाशी सेक्टर १४ येथील बहुउद्देशीय इमारतीत करण्यात आलेली आहे.

२. सद्य:स्थितीत या अलगीकरण कक्षात ५८ विदेशांतून प्रवास करून आलेल्या नागरिकांना भरती करण्यात आले आहे. त्यांना वैद्यकीय सुविधा, जेवण यांसह सर्व आवश्यक व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. ३. २२७ नागरिक त्यांच्या निवासस्थानी अलगीकरण (होम क्वारंटाईन) करून रहात आहेत. स्थानिक नागरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकार्‍यांच्या नियंत्रणाखाली कार्यरत असलेल्या शीघ्र प्रतिसाद पथकाकडून त्यांच्याशी नियमित संपर्क साधला जात आहे.

४. घरी अलगीकरण करून रहात असलेल्या प्रवाशांनी आपल्या घराबाहेर पडू नये अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणी वारंवार देऊनही घराबाहेर पडलेल्या एका प्रवाशाच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

५. विदेशातून प्रवास करून नवी मुंबईत आलेल्या प्रवाशांची माहिती स्वत: प्रवासी, त्यांचे कुटुंबीय आणि नागरिक यांनी नवी मुंबई महानगरपालिकेकडे देण्यासाठी, त्याचप्रमाणे कोरोनाविषयक अधिकची माहिती देण्या-घेण्यासाठी टोल फ्री क्रमांक १८००२२२३०९ किंवा २३१० याचा वापर करावा, असे आवाहन महानगरपालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी केले आहे.