शतचंडी यागाचा यागातील विविध घटकांवर पुष्कळ सकारात्मक परिणाम होणे

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त २० आणि २१ मे या दिवशी शतचंडी याग संपन्न !

‘भारत-पाक युद्धात भारताच्या विजयासाठी, तसेच सैनिकांसह धर्मकार्य करणार्‍यांच्या रक्षणासाठी ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त २० आणि २१ मे या दिवशी शतचंडी याग करण्यात आला. सद्गुरु नीलेश सिंगबाळ आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, तसेच सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ अन् श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी यज्ञाचे यजमानपद भूषवले. तमिळनाडू येथील श्री. गुरुमूर्ती शिवाचार्य, श्री. अरुणकुमार गुरुमूर्ती यांसह ३५ पुरोहितांनी यज्ञातील धार्मिक विधी केले.

अशा या ‘शतचंडी यागाचा यागातील विविध घटकांवर काय परिणाम होतो ?’, हे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने काही संशोधनात्मक चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांसाठी लोलकाचा उपयोग करण्यात आला. लोलकाने वस्तू, वास्तू अन् व्यक्ती यांच्यातील सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा मोजता येतात. हे संशोधन पुढे दिले आहे.

यज्ञात आहुती देतांना पुरोहित शिवाचार्य गुरुमूर्ती, अन्य पुरोहित आणि यज्ञाच्या ठिकाणी करण्यात आलेली देवतांची मांडणी

१. चाचण्यांतील निरीक्षणांचे विवेचन

यागातील विविध घटकांची यागापूर्वी आणि यागानंतर छायाचित्रे काढण्यात आली. या सर्व छायाचित्रांच्या लोलकाने चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांतील नोंदी पुढे दिल्या आहेत.

१ अ. यागाला उपस्थित साधक आणि साधिका यांच्यावर यागाचा सकारात्मक परिणाम होणे : यागापूर्वी तीव्र आध्यात्मिक त्रास असलेली साधिका आणि आध्यात्मिक त्रास नसलेला साधक यांच्यामध्ये काही प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आढळली; पण यागानंतर ती नाहीशी झाली. यागापूर्वी सर्वांमध्ये सकारात्मक ऊर्जा होती आणि यागानंतर त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत वाढ झाली. या सर्वांतील सकारात्मक ऊर्जेच्या नोंदी पुढे दिल्या आहेत.

१ अ १. निष्कर्ष : यागानंतर साधक आणि साधिका यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत अनुमाने ११ ते २० मीटरने वाढ झाली. यातून ‘सर्वांना यागाचा आध्यात्मिकदृष्ट्या लाभ झाला’, असे लक्षात येते.

लोलक

१ आ. यागानंतर श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ होणे : श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही. यागापूर्वीही दोघींमध्ये पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा होती आणि यागानंतर त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत आणखी वाढ झाली. हे पुढे दिलेल्या नोंदींवरून लक्षात येते.

१ आ १. निष्कर्ष : श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ झाली. यातून ‘दोघींमधील चैतन्य समष्टीच्या कल्याणासाठी कार्यरत झाले’, असे लक्षात येते.

१ इ. पुरोहितांवर यागाचा सकारात्मक परिणाम होणे : पुरोहितांमध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही. यागापूर्वी पुरोहितांमध्ये चांगल्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा होती आणि यागानंतर त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत आणखी वाढ झाली. हे पुढे दिलेल्या नोंदींवरून लक्षात येते.

१ इ १. निष्कर्ष : पुरोहितांमधील सकारात्मक ऊर्जेत अनुमाने ३३ ते ३९ मीटरने वाढ झाली. यातून ‘पुरोहितांना यागाचा आध्यात्मिकदृष्ट्या लाभ झाला’, असे लक्षात येते.

१ ई. यागाचा तेथील वातावरण आणि यागातील अन्य घटक यांच्यावरही सकारात्मक परिणाम होणे : ‘शतचंडी यागाचा तेथील वातावरण, तसेच यागातील प्रधान देवता (कलशस्वरूपातील श्री महाकालीदेवी, श्री महालक्ष्मीदेवी आणि श्री महासरस्वतीदेवी), यज्ञकुंड आदी घटकांवर काय परिणाम होतो ?’, हेही अभ्यासण्यात आले. कोणत्याही घटकामध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही. यागापूर्वी सर्व घटकांमध्ये पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा होती आणि यागानंतर त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत आणखी वाढ झाली. हे पुढे दिलेल्या नोंदींवरून लक्षात येते.

१ ई १. निष्कर्ष : श्री महाकालीदेवी, श्री महालक्ष्मीदेवी आणि श्री महासरस्वतीदेवी यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत अनुक्रमे १७८४ मीटर, ९८५ मीटर अन् ९७५ मीटर यांनी वाढ झाली. यज्ञस्थळाची भूमी, हवेचा नमुना आणि यज्ञकुंड यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत अनुक्रमे ११९०, २३२५ मीटर अन् १४१० मीटर यांनी वाढ झाली, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. यातून ‘शतचंडी यागाचा तेथील वातावरण आणि यागातील अन्य घटक यांच्यावर पुष्कळ सकारात्मक परिणाम झाला’, असे लक्षात येते.

सौ. मधुरा धनंजय कर्वे

२. चाचण्यांतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण

कालमाहात्म्यानुसार वर्ष २०२५ हा आपत्काळ आहे. या आपत्काळात सैनिकांसह देश-विदेशात साधना करणारे साधक आणि धर्मप्रेमी यांच्या भोवती संरक्षककवच आवश्यक आहे. यासाठी देवता, ऋषिमुनी, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि संत यांच्या आज्ञेने हा शतचंडी याग करण्यात आला. या यागातून सैनिक, साधक आणि धर्मप्रेमी यांच्या शरिरासह मन, बुद्धी अन् सूक्ष्म देह यांभोवती संरक्षककवच निर्माण व्हावे, तसेच देवीची कृपा आणि आशीर्वाद सर्वांना सदैव मिळावा, यांसाठी आदिशक्तीच्या चरणी प्रार्थना करण्यात आली. पुरोहितांनी यज्ञात तिन्ही देवींना आवाहन करून त्यांचे पूजन, त्यांच्या कृपेसाठी हवन, मंत्रपठण इत्यादी धार्मिक विधी भावपूर्ण अन् परिपूर्ण केले. सद्गुरु नीलेश सिंगबाळ आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, तसेच सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ अन् श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी देवींना भावपूर्ण प्रार्थना केली. यामुळे तिन्ही देवींमधील तत्त्व (चैतन्य) पुष्कळ प्रमाणात कार्यरत झाले. शतचंडी यागातून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित झाले. यामुळे तेथील वातावरण चैतन्यमय बनले. यागाला उपस्थित विविध आध्यात्मिक पातळीचे त्रास असलेले आणि नसलेले साधक अन् साधिका यांनी त्यांची क्षमता अन् भाव यानुसार यागातील चैतन्य ग्रहण केले. पुरोहितांनाही यागाचा आध्यात्मिक स्तरांवर लाभ झाला. थोडक्यात शतचंडीयागाचा यागातील सर्वच घटकांवर पुष्कळ सकारात्मक परिणाम झाला.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (५.८.२०२५)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक