पानशेत (पुणे) पूरग्रस्त सोसाट्यांचे प्रश्न ६५ वर्षांनंतरही प्रलंबित !

९० सोसाट्यांचे प्रश्न अजूनही रखडलेले

पुणे – १२ जुलै १९६१ या दिवशी पानशेत धरणफुटीला ६५ वर्षे पूर्ण होत आहेत. या पुरामुळे बाधित झालेल्या अनेक वसाहती आणि मागासवर्गीय गृहनिर्माण सोसायट्यांचे प्रश्न अद्यापही सुटलेले नाहीत. सहकारनगर नं. १, २, पद्मावती, सेनादत्त सोसायटी, नवी पेठ, सेनापती बापट रस्ता आदी पूरग्रस्त सोसाट्यांच्या सभासदांनी याविषयी तीव्र अप्रसन्नता व्यक्त केली आहे. ‘अनेक वर्षांपासून विविध शासकीय कार्यालयांमध्ये पाठपुरावा करूनही आमचे प्रश्न सुटत नाहीत’, अशीही खंत व्यक्त केली. (६५ वर्षांनंतरही पूरग्रस्तांचे प्रश्न प्रलंबित रहाणे, ही असंवेदनशीलतेची परिसीमा आहे. या पीडितांना न्याय मिळण्यासाठी कराव्या लागणार्‍या संघर्षाचे दायित्व कुणाचे ? हा मनस्ताप कसा भरून निघणार ? – संपादक)

१०३ सोसाट्यांपैकी केवळ १३ सोसायट्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे. उर्वरित ९० सोसाट्यांचे प्रश्न अजून प्रलंबित आहेत. यासाठी प्रशासनाने विशेष मोहिम राबवत सर्व प्रकरणांचा एकत्रित आढावा घ्यावा. त्यासाठी स्वतंत्र पूर्णवेळ प्रशासकीय अधिकारी नेमावा, अशी मागणी ‘पानशेत पूरग्रस्त गृहरचना संस्था विकास महामंडळा’कडून करण्यात येत आहे.

१९६१ च्या पुरानंतर अनेक कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात आले. काही वसाहती आणि गृहनिर्माण सोसायट्यांशी संबंधित मालकी हक्क, भूमीच्या नोंदी, विकास अनुमती, मूलभूत सुविधा आणि इतर प्रशासकीय गोष्टी आजही रखडल्या आहेत. त्यामुळे या नागरिकांना विविध शासकीय कामांसाठी अडचणींना समोरे जावे लागत आहे.