बांगलादेशी घुसखोरांचे निर्वासन आणि भारताची सुरक्षा !

‘बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर अनेक घडामोडी झाल्या आहेत. भारतात अनधिकृतपणे रहाणार्‍या बांगलादेशी नागरिकांना बंगालमधून हद्दपार केले जात आहे. दुसरीकडे बांगलादेशात उभारण्यात येणारे हिंदु देवतांच्या मूर्ती असलले ‘सनातन संकुला’चे काम कट्टरतावाद्यांच्या तीव्र विरोधानंतर थांबवावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर ‘प्रारब्ध’ या ‘यू ट्यूब’ वाहिनीवर संपादक अवनीश शर्मा यांच्याशी संवाद साधतांना बांगलादेशातील ‘ब्लिट्झ’ साप्ताहिकाचे संपादक शोएब चौधरी यांनी व्यक्त केलेले विचार या लेखात देत आहोत.

AI निर्मित प्रतिकात्मक चित्र

१. बंगालमधून घुसखोरांचे निर्वासन

बंगाल राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आली. त्यानंतर बांगलादेशी घुसखोरांना हद्दपार केले जात आहे. त्यांच्या संदर्भात बांगलादेशाने प्रारंभी ते बांगलादेशी असल्याचे नाकारले होते; पण नंतर भारत ज्या लोकांना हद्दपार करत आहे, ते सर्व बांगलादेशी असल्याचे सिद्ध झाले. आता बांगलादेशी अधिकार्‍यांनीही घुसखोरांना परत आणण्याच्या सूत्रावर भारताशी चर्चा केली आहे. भाजपच्या राज्यात असे प्रकार चालणार नाहीत, हे ममता बॅनर्जींच्या कार्यकाळात बंगालमध्ये शरण घेतलेल्या सर्व घुसखोरांना लक्षात आले आहे. परिणामी हे सर्व घुसखोर परत जाण्यासाठी घाई करत आहेत. इतकेच नाही, तर त्यांची वाहतूक करणारे, त्यांना आधार कार्ड आणि ‘पासपोर्ट’ (पारपत्र) मिळवून देणार्‍या दलालांनाही चिंता सतावत आहे.

२. बांगलादेशातील ‘सनातन संकुला’ला कट्टरतावाद्यांचा विरोध

बांगलादेशातील गायबांधा जिल्ह्यात बांधल्या जात असलेल्या सनातन संकुलात भगवान शिव आणि भगवान कृष्ण यांच्या मूर्ती आधीच सिद्ध होत्या अन् प्रभु श्रीरामाची मूर्ती सिद्ध केली जात आहे. हा आशियातील सर्वांत मोठा सनातन प्रकल्प आहे आणि असा प्रकल्प उभारला जाणे, ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे; पण त्याला बांगलादेशाचे तत्कालीन पंतप्रधान युनूस यांच्या नियंत्रणाखालील मूलतत्त्ववाद्यांनी विरोध केला. त्यामुळे हा प्रकल्प थांबवण्यात आला आहे.

यामागे बांगलादेशातील प्रकल्प बंद पाडला आणि तेथील मूर्ती नष्ट केल्या, तर त्याची जागतिक स्तरावर मानहानी होईल, हे कारस्थान. बांगलादेशाने शांततेत रहावे, असे पाकिस्तानला अजिबात वाटत नाही. त्यांना या घटनेला आतंकवादाचा रंग द्यायचा आहे. दुर्दैवाने तेथील सरकारने हा प्रकल्प थांबवला आणि या प्रकल्पामध्ये सहभागी असलेल्या आयोजकांच्या विरोधात चौकशी चालू केली. प्रतिवर्षी इस्लामी देशांकडून बांगलादेशात मशिदी बांधण्यासाठी कोट्यवधी डॉलर्स येतात; पण त्याची कुणाला चिंता नाही. पाश्चात्त्य देश चर्च बांधण्यासाठी पैसे पाठवत आहेत, त्याविषयीही काही अडचण नाही. जपान पॅगोडा बांधण्यासाठी पैसे पाठवत आहे, त्याचीही काही अडचण नाही; पण जेव्हा एखाद्या हिंदु मंदिरात श्रीराम, श्रीकृष्ण किंवा शिव यांच्या मूर्तींची स्थापना होत असेल, तर समस्या निर्माण होते. जिहादी धर्मांध प्रभु श्रीरामाच्या प्रतिमेच्या विरोधात घोषणाबाजी करून त्यांचा अपमान करत आहेत. हा निव्वळ धर्मद्रोह आहे. हेच इस्लामविषयी संदर्भात घडले असते, तर आतापर्यंत १००-२०० खटले प्रविष्ट झाले असते.

बांगलादेशात सध्या ८ टक्के हिंदु लोकसंख्या आहे आणि जगभरात १२० कोटी हिंदु आहेत. त्यामुळे हे मंदिर बांधण्यासाठी हिंदूंनी पैसे पाठवले, तर त्यात अडचण काय आहे ? जर ख्रिस्ती, मुसलमान आणि बौद्ध देश त्यांच्या धार्मिक स्थळांसाठी पैसे पाठवू शकतात, तर हिंदूंनी पैसे पाठवले, तर बिघडले कुठे ? आता हे मंदिर बंद केले आहे. बांगलादेशातील या सनातन प्रकल्पाचे संरक्षण करणे आवश्यक आहे. त्यासाठी भारतातील हिंदूंसह जगभरातील १२० कोटी हिंदूंनी संघटित होऊन आवाज उठवला पाहिजे. दुर्दैवाने ‘प्रारब्ध’ किंवा ‘ब्लिट्झ’ या वाहिन्यांखेरीज दुसर्‍या कोणत्याही जागतिक स्तरावरील वा मुख्य प्रवाहातील माध्यमांनी याची नोंद घेतली नाहीच; पण भारतातील माध्यम संस्थाही (मिडिया हाऊसही) गप्प बसल्या आहेत.

अवनीश शर्मा व शोएब चौधरी

३. जाहिद रहमान प्रकरण आणि भारताची सुरक्षा

हे सर्व घडत असतांनाच बांगलादेश येथील तारिक रहमानचा सल्लागार जाहिद उर रहमान हा एका परिषदेसाठी भारताच्या अधिकृत दौर्‍यावर नवी देहलीत आला. त्याच्याकडे कोणताही राजनैतिक ‘पासपोर्ट’ आणि भारतीय ‘व्हिसा’ नव्हता. हा जाहिद रहमान अनेक वर्षांपासून एक ‘यू ट्यूब’ वाहिनी चालवत आहे आणि त्या माध्यमातून तो रात्रंदिवस भारताची मानहानी करत आहे. तो काश्मीर आणि आतंकवादी यांच्या बाजूने बोलतो; कारण तो पाकिस्तानची गुप्तचर संस्था ‘आय.एस्.आय.’च्या जवळचा आहे. त्याने नवी देहली विमानतळावर एक नाटक रचले. ते सनातन धर्म प्रकल्पाविरुद्धचा कट दडपण्यासाठीच होते, हे स्पष्ट आहे.

या जाहिद रहमानला भारत सरकारने काळ्या सूचीत घालावे, तसेच त्याला विमान प्रवास बंदी करावी. त्यामुळे तो जगात कुठेही जाऊ शकणार नाही; कारण त्याला कुठेही जायचे असेल, तर भारतीय आकाशाचाच वापर करावा लागेल. त्याला कठोर शिक्षा मिळाली, तर अन्य बांगलादेशींना एक धडा मिळेल.

४. भारतविरोधी भू-राजकीय जाळे

भारत आमच्यासाठी अपरिचित नाही, तर तो आमचा नातेवाईक आहे. जर बांगलादेशाकडून भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होत असेल, तर भारत त्याचे निश्चितपणे संरक्षण करील. त्यामुळे तो त्याच्या सीमेवर कुंपण करत असेल, तर चांगली गोष्ट आहे. जर बांगलादेशातील नागरिकांना भारतात जायचे असल्यास त्यांनी अधिकृतपणे जावे. भारत त्यांचे स्वागतच करील; पण जर कुणी भारतात एका वेगळ्याच (आतंकवादी उद्देशाने) उद्देशाने जात असतील, तर ते चुकीचे आहे आणि घुसखोर हे दुसर्‍याच गोष्टीसाठी जात आहेत. देशात पाकिस्तानी छुप्या गटांशी संबंधित आतंकवादी प्रतिदिन पकडले जात आहेत.

बांगलादेशातील राजवट पालटल्यानंतर लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-महंमद या संघटनाही तेथे आल्या आहेत अन् अजूनही सक्रीय आहेत. तेथे पाकिस्तानी गुप्तचर संस्था ‘आय.एस्.आय.’च्या कारवायाही मोठ्या प्रमाणावर चालू असून त्यांच्या समवेत पाकिस्तानची मित्र ‘हमास’ ही आतंकवादी संघटनाही आहे. भारताला हानी पोचवणे, हा त्यांचा एकमेव उद्देश आहे. त्यामुळे कोणताही बांगलादेशी घटक भारतात घुसला, तर त्याला त्याच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी योग्य ते सर्व काही करण्याचा पूर्ण अधिकार आहे.

५. पाकिस्तान हाच बांगलादेशाचा खरा शत्रू !

जेव्हा बांगलादेशाला पेट्रोल आणि डिझेल यांची आवश्यकता होती, तेव्हा भारताने आधी ५ सहस्र टन आणि नंतर ७ सहस्र टन पेट्रोल-डिझेल पुरवले. संकटाच्या काळात भारताला स्वतःला पेट्रोलची आवश्यकता असतांनाही त्याने त्याच्या वाट्यातून काही भाग आम्हाला दिला. एवढे करूनही दुर्दैवाने बांगलादेशींनी ‘सनातन प्रकल्प’ बंद पाडला आणि देहली विमानतळावर नाटक केले. हे लोक भारताकडून उपकार स्वीकारतात; पण त्याच्याशीच द्रोह करतात. जेव्हा शेख हसीना सत्तेवर होत्या, तेव्हा भारताने इतके सहकार्य केले की, बांगलादेशाची अर्थव्यवस्था सुधारू लागली होती. बांगलादेशाची अर्थव्यवस्था समृद्ध होत असल्यामुळे भारतातील लोक पुष्कळ आनंदी होते; कारण बांगलादेशाचा उदय हा भारताच्या योगदानामुळेच झाला होता. खरा बंगाली कधीही भारताशी द्रोह करत नाही. बांगलादेशातील घुसखोर, रोहिंग्या, अडकलेले पाकिस्तानी आणि आतंकवादी संघटना या जगात बांगलादेशाची मानहानी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे भारताने त्याची राष्ट्रीय सुरक्षा अधिक कडक करणे आवश्यक आहे. पाकिस्तान हाच आमचा एकमेव शत्रू आहे आणि बांगलादेशाला उद्ध्वस्त करण्यासाठीच पाकिस्तान बांगलादेशात घुसला आहे.

बांगलादेशातील कोणत्याही सरकारचे काँग्रेसशी चांगले संबंध असतात. काँग्रेसचा उद्देश भारताची हानी करणे, हा आहे. त्यासाठी ती कुणाशीही हातमिळवणी करण्यास मागे-पुढे पहात नाही.’

– शोएब चौधरी, संपादक, साप्ताहिक ‘ब्लिट्झ’ बांगलादेश.

(साभार : ‘प्रारब्ध’ यू ट्यूब वाहिनी)