आज ‘जगन्नाथ रथयात्रा’ आहे. त्या निमित्ताने…

१. श्रीक्षेत्र जगन्नाथपुरीचे वैशिष्ट्य
महाम्भोधेस्तीरे कनकुरुचिरे नीलशिखरे वसन् प्रासादान्त: सहजबलभद्रेण बलिना ।
सुभद्रामध्यस्थ: सकलसुरसेवावसरदो जगन्नाथ: स्वामी नयनपथगामी भवतु मे ।। – जगन्नाथ अष्टक, श्लोक ३
अर्थ : महासागराच्या तीरावर, सोन्याप्रमाणे चमकणार्या नीलशिखरावर स्थित असलेल्या भव्य मंदिरात आपले बलवान भाऊ बलभद्र आणि मध्यभागी बहिण सुभद्रा यांच्यासह निवास करणारे, सर्व देवतांना सेवेची संधी प्रदान करणारे जगन्नाथस्वामी माझ्या दृष्टीपथात विराजमान राहोत.
समुद्राच्या तीरावरील या क्षेत्राला ‘श्रीक्षेत्र’, ‘पुरुषोत्तमक्षेत्र’, ‘शंखक्षेत्र’ या नावानेही ओळखले जाते. ओडिशात विष्णूच्या ४ आयुधांची क्षेत्रे असून त्यांपैकी हे शंखक्षेत्र होय.
२. क्षेत्रमाहात्म्याची कथा
क्षेत्रमाहात्म्यात यासंदर्भात एक वेगळी कथा येते. अश्वमेधयज्ञ पूर्ण झाल्यावर इंद्रद्युम्न राजाला दृष्टांत झाला की, ‘नीलमाधव’ एका चंदनी ओंडक्याच्या रूपाने प्रकट होणार आहे. ज्यावर पद्म आणि चक्र असेल, तो विष्णुरूप ओंडका असे समजावे. त्याप्रमाणे यज्ञानंतर थोड्याच दिवसांत एक चंदनी ओंडका समुद्रकिनार्यास लागला. त्यावर पद्म आणि चक्र या खुणा होत्या. ‘त्याची मूर्ती कशी घडवावी ?’, या विवंचनेत तो राजा असतांना साक्षात् विश्वकर्मा मूर्तीकाराचे रूप घेऊन आला आणि म्हणाला, ‘‘हे राजा, मला देवळाच्या गाभार्यात २१ दिवसांपर्यंत कोंडून ठेव. ही अट पाळलीस, तर मी या ओंडक्याच्या मूर्ती बनवीन. २१ दिवस पूर्ण झाल्यावरच दरवाजा उघड.’’ राजाने त्याची अट मान्य केली.
‘गुंदिचा’ नावाची राजाची राणी होती. तिच्या मनात विकल्प आला आणि त्या कारागिराविषयी संशय उत्पन्न झाला. राणीच्या वारंवार बोलण्यामुळे राजाने एक दिवस गाभार्याचे दार अचानक उघडले. पहातो तर हात-पाय नसलेली मूर्ती तिथे होती आणि मूर्तीकार मात्र अदृश्य झाला होता. घाबरून जाऊन राजाने देवाची प्रार्थना केली. त्यावर त्या मूर्तीच्या मुखातून शब्द उमटले, ‘‘हे राजा, प्रथम अहंकार धरलास; म्हणून इंद्रनील मण्यांची मूर्ती तुला लाभली नाही. आता राणीच्या शंकेखोरपणामुळे मी असा अपूर्ण राहिलो; पण तू याच रूपात माझी प्रतिष्ठापना कर. मी तुझ्या भक्तीने आजही प्रसन्न आहे.’’
रथयात्रा

अ. आषाढ शुक्ल द्वितीयेस हा महोत्सव आरंभ होतो. तो दशमीपर्यंत चालतो. या उत्सवात सर्व मूर्ती मंदिरातून बाहेर काढल्या जातात. ‘पहंडी’ म्हणजे मूर्तींना मंदिरातून आणून रथात स्थापणे ! प्रथम सुदर्शनचक्र सुभद्रेच्या रथात स्थापले जाते. नंतर बलराम, सुभद्रा आणि जगन्नाथ यांची रथात स्थापना होते. या मूर्ती प्रचंड मोठ्या आणि जड असल्याने त्यांना वाहायला ६-७ सशक्त पुजारी लागतात. त्यांचे रथही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. जगन्नाथाच्या रथाला ‘नंदीघोष’ म्हणतात. तो ४५ फूट उंच असून त्याला १८ चाके आहेत. तो पिवळ्या लाल रंगात असतो. बलभद्राचा ‘तालध्वज’ रथ हिरव्या-लाल रंगात आणि सुभद्रेचा ‘देवदालन’ रथ काळ्या-लाल रंगात असतो. ‘नवीन रथासाठी लागणारे लाकूड कसे मिळावे ?’, याचेही बरेच नियम आहेत. रथ सिद्ध झाल्यावर ओडिशाचे राजा रथापुढची जागा सोनेरी दांड्याच्या झाडूने झाडतो. ओडिशाच्या राजाचा हा गजपती वंश स्वतःला जगन्नाथाचा दास समजतो. या सेवेस ‘छेरा पहँरा’ असे म्हणतात.
आ. रथाला दोर लावून सहस्रो भक्त तो रथ ओढतात. सिंहद्वारापासून ३ कि.मी.वरील गुंडीचा मंदिरापर्यंत ही यात्रा जाते. पुढील ७ दिवस मूर्ती तिथेच असतात आणि द्वादशीच्या दिवशी मंदिरात परत आणल्या जातात. ‘इंद्रद्युम्न’ राजाची पत्नी ‘गुंडीचा’ हीसुद्धा विष्णूची परमभक्त होती. त्या वेळी नीलमाधवाची पूजा ‘विश्वावसू शबर’ करत होता; परंतु ‘गुंडीचा’ राणीची भक्ती पाहून जगन्नाथाने प्रतिवर्षी तिच्या घरी ९ दिवस यायचे मान्य केले. तीच ही रथयात्रा !
(साभार : विविध संकेतस्थळे)
३. जगन्नाथ मंदिर
३ अ. भौगोलिक स्थिती : जगन्नाथ मंदिर हे भारतातील एक उंच मंदिर असून रस्त्यापासून त्याची उंची २१४ फूट आहे. ते एका दगडी उंचवट्यावर उभे असून अनुमाने १० एकर क्षेत्रात हे दगडी पठार आहे. मंदिराभोवती १० फूट उंचीच्या २ तटबंदी भिंती असून पूर्वाभिमुख असलेल्या मंदिरावर अतिशय सुंदर शिल्पे आहेत. ज्या मोठ्या कातळी पठारावर हे मंदिर उभे आहे. तो नीलगिरी पर्वताचाच भाग मानतात, जो नंतर भूमीत गुप्त झाला.
३ आ. मंदिराच्या आतील रचना : मंदिरास ४ मुख्य द्वारे असून पूर्वेस सिंहद्वार, उत्तरेस हत्तीद्वार, दक्षिणेस अश्वद्वार आणि पश्चिमेस वाघद्वार आहे. पूर्वेकडील सिंहद्वार हे महाद्वार असून त्यासमोरच एक उंच काळ्या पाषाणाचा स्तंभ आहे, ज्याला ‘अरुणस्तंभ’ म्हणतात. तो कोणार्क येथील सूर्यमंदिरातून फार पूर्वीच आणला गेला आहे. मंदिरामध्ये मुक्तीमंडप, भोगमंडप, नटमंदिर, मुखशाला अशा बर्याच जागा असून तिथे बालभोग अर्पण, कथा-कीर्तने, जप-तप, देवदासींची नृत्ये अशा अनेक गोष्टी चालतात. गाभार्यावरील विमान (कळसाचा भाग) २१३ फूट उंच असून त्याच्यावर सुदर्शनचक्र आहे आणि त्यावर ध्वज फडकत असतो.
३ इ. मंदिराच्या गर्भागृहातील रचना : गर्भगृहामध्ये जगन्नाथ (कृष्ण), बलराम आणि सुभद्रा यांच्या लाकडी मूर्ती आहेत. जगन्नाथ आणि बलराम यांना हात आहेत; पण पाय नाहीत. सुभद्रेस पाय नाहीत. बलराम पांढर्या रंगात, सुभद्रा पिवळ्या रंगात आणि स्वामी जगन्नाथ काळ्या रंगात आहेत. मूर्ती रत्नांच्या सिंहासनावर सुप्रतिष्ठित असून मूर्तींना केवळ डोळे, नाक आणि तोंड हे अवयव आहेत. ओंडक्याच्या, लाकडाच्या स्वरूपात असलेल्या देवांना येथे ‘दारूब्रह्म’ असे संबोधले जाते.
३ ई. मुख्य मंदिराच्या आजूबाजूचा परिसर : मुख्य मंदिराच्या बाजूने त्या प्रांगणात ३० मंदिरे असून ‘यात्रा करणार्यांनी त्या सर्वांचे दर्शन घेऊन मग जगन्नाथाचे दर्शन घ्यावे’, असे म्हणतात. तेथील किमान ३ मंदिरांचे म्हणजे गणेश मंदिर, विमला मंदिर आणि लक्ष्मी मंदिर यांचे दर्शन घेणे आवश्यक आहे. येथील विमलादेवी ही शक्तिपीठांपैकी एक मानली जाते. जवळच मुक्तीमंडपाच्या मागील बाजूस मुक्तनृसिंह मंदिर असून तोच येथील क्षेत्रपाल आहे. ‘आद्यशंकराचार्यांनी संकटनाशन लक्ष्मी-नृसिंहस्तोत्राची रचना येथेच केली’, असे लोक मानतात.
३ उ. कल्पवट : गणेश मंदिराजवळच असलेल्या वटवृक्षाला ‘कल्पवट’ असे म्हणतात. ‘या कल्पवटाच्या दर्शनाने सर्व इच्छा पूर्ण होतात’, असे सर्व भक्त मानतात. ‘त्या वृक्षाखालीच वटपत्रशायी बालमुकुंदाचे दर्शन मार्कंडेयऋषींना घडले होते’, अशी कथा स्कंदपुराणात आहे.
४. पुरीतील इतर तीर्थे आणि मंदिरे
जगन्नाथपुरीत अनुमाने ८ ते १० जलतीर्थे आहेत. त्यांपैकी समुद्रस्नान, रौहिणकुंड, मार्कंडेय सरोवर, इंद्रद्युम्न सरोवर हे स्नानासाठी मुख्य मानलेली आहेत. सिंहद्वारासमोरच रामानुजाचार्यांचा ‘एमार मठ’ आहे. याखेरीज कबीर मठ, कानवत हनुमान, कपोतेश्वर, भंगीरामठ, चक्रनारायण मंदिर, नरसिंह मंदिर इत्यादी ठिकाणे महत्त्वाची आहेत. भक्तीसिद्धांत स्वामींचा गौडीय मठ आणि चैतन्य महाप्रभु यांचे तोटा गोपीनाथ मंदिरही प्रसिद्ध आहे.
५. नवकलेवर उत्सव
५ अ. ‘नवकलेवर’ अथवा ‘ब्रह्मपरिवर्तन’ विधी : पुरी येथील या देवाच्या मूर्ती लाकडी आहेत. काही काळानंतर लाकूड खराब होत असल्यानेच जगन्नाथादी देवतांच्या पहिल्या मूर्ती विसर्जित करून दुसर्या मूर्ती बनवून त्यांची स्थापना करावी लागते. या विधीलाच ‘नवकलेवर’ अथवा ‘ब्रह्मपरिवर्तन’ असे म्हणतात. नवकलेवर, म्हणजे नवीन शरीर धारण करणे. जेव्हा अधिक आषाढ मास येतो, तेव्हा म्हणजेच ८, ११ अथवा १९ वर्षांनी हा विधी संपन्न होतो.
५ आ. मूर्तीसाठी काष्ठ शोधणे : अधिक आषाढ असेल, त्याच वर्षी चैत्रामध्येच सेवक वर्ग नवीन लाकूड शोधण्यास बाहेर पडतो. गजपती गौडेश्वर (ओडिशाचा राजा) त्यापैकी एकाला ‘विश्वावसू शबर’ म्हणून नियुक्त करतो. नंतर ‘दारूसंधान’ यात्रा चालू होते. मंगलादेवीची निराहार उपासना सर्व जण करतात. मग मंगलादेवी स्वतः लाकूड (दारू) निवडण्याचा दृष्टांत देते. ‘कोणत्या देवतेचा वृक्ष कसा हवा ?’, हेही संकेत ठरलेले आहेत. बनयाग, सहस्रहुती, निर्जल उपवास, वृक्षपूजा इत्यादी झाल्यावर नंतर लाकूड तोडण्यात येते. ते लाकूड वाजतगाजत मंदिरात आणून ज्येष्ठ पौर्णिमेपर्यंत तसेच ठेवतात.
५ इ. मूर्ती बनवणे : स्नान, चंदन लेपन, अंकुररोपण यज्ञ झाल्यावर पुढे १५ दिवस नवीन मूर्ती करण्याचे काम चालते. जगन्नाथाच्या ठायी ब्रह्मतत्त्व स्थापण्यासाठी त्याच्या हृदयात एक नाभी सिद्ध केली जाते. नंतर वैदिक मंत्रघोषात जीवन्यास करतात, म्हणजे जुन्या मूर्तीतील ब्रह्मतत्त्व काढून नवीन मूर्तीत त्याची स्थापना होते. आषाढ शुद्ध चतुर्दशीला हा ‘नवकलेवर’ सोहळा होतो. जुन्या मूर्तींना कोईल वैकुंठ येथे भूमीखाली समाधी देतात. त्यानंतर शोक प्रकरण, पुष्करिणी स्नान, तेराव्या दिवशी ब्रह्मभोजन, नवीन मूर्तीचा नेत्रोत्सव, नवयौवन दर्शन, रथयात्रा अशा अनेक विधींनी तो सोहळा पूर्ण होतो.
५ ई. काष्ठमूर्तीत वसलेले ब्रह्मतत्त्व, म्हणजे ‘रत्नपेटिका’ आणि त्याचा इतिहास : या काष्ठमूर्तीत जे ब्रह्मतत्त्व आहे, त्यास ‘रत्नपेटिका’ असेही म्हणतात. शतकानुशतके ती रत्नपेटी ब्रह्मतत्त्व चिरंतन आहे. आद्यशंकराचार्य जेव्हा त्यांच्या यात्रेत पुरी येथे पोचले. त्या वेळी तेथे जगन्नाथाची काष्ठमूर्ती नसून शाळीग्रामशिळेवरच पूजा होत होती. हे पाहून आचार्य व्यथित झाले. पुजार्याकडे विचारणा केल्यावर असे कळले की, अन्य धर्मियांच्या आक्रमणामध्ये (काहींच्या मते कालयवनाच्या वेळेस) लुटीच्या भयाने काष्ठमय मूर्ती स्थानांतरित करण्यात आली होती; मात्र ‘रत्नपेटी कुठे गाडली आहे ?’, हे कुणालाही ठाऊक नव्हते. भक्त आणि पुजारी यांना ती शोध घेऊनही सापडली नाही. तेव्हा तेथे शाळीग्रामशिळेवर पूजा चालू झाली. पुजार्यांना सांगून आचार्य ध्यानमग्न झाले. लोक झुंडीने येऊ लागले आणि त्यांचे ध्यान उतरायची वाट पाहू लागले. ध्यान संपल्यावर आचार्य म्हणाले, ‘‘चिल्कासरोवराच्या पूर्व किनार्यावर जो सर्वांत मोठा वटवृक्ष आहे, त्याखाली उत्तरदिशेस रत्नपेटिका पुरलेली आहे.’’ पुरीच्या नागरिकांना आनंद झाला. त्यांनी आचार्यांचा जयजयकार केला. राजकर्मचारी, पंडे, पुजारी आणि सेवेकरी सर्व तेथे गेले अन् वाजतगाजत रत्नपेटीका मंदिरात आली. लाकडाची मूर्तीही बनवण्यात आली आणि यथाविधी ब्रह्मस्थापना होऊन पुन्हा काष्ठमूर्तीची पूजा चालू झाली.’
(साभार : विविध संकेतस्थळे)
अहंकार कि सत्याचा शोध ?
गरम शेक आणि गार शेक
‘इंडो-पॅसिफिक’ : २१ व्या शतकातील भारताच्या सुरक्षेचा नवा महामार्ग !
कर्णावती (गुजरात) बाँबस्फोट प्रकरणाच्या खटल्याचा निकाल : भारतीय राज्याच्या उत्क्रांतीतील एक धोरणात्मक मैलाचा दगड !
‘पंडवानी’ या लोककलेच्या सादरीकरणाच्या माध्यमातून समाजात ईश्वरभक्तीचा प्रसार करण्याचे समष्टी सेवाकार्य निरपेक्षभावाने करणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पद्मविभूषण कै. डॉ. तीजनबाई !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘विज्ञानामुळे होणारी हानी’ या विषयावरील लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !