शास्त्र आणि शौर्य यांच्या आधारे बौद्धिक स्तरावर मूलभूत परिवर्तन घडवण्यासाठी झटणारे योद्धा श्री. संजीव नेवर !

नोएडा (उत्तरप्रदेश) येथील श्री. संजीव नेवर हे ‘अग्नी समाज’, ‘जेम्स ऑफ बॉलीवूड’, ‘सेवा न्याय उत्थान फाऊंडेशन’ या संस्थांचे संस्थापक आहेत. ‘प्राच्यम्’ या ‘ओटीटी प्लॅटफॉर्म’ला दिलेल्या मुलाखतीत श्री. संजीव नेवर यांनी ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आय.आय.एम्. – भारतीय व्यवस्थापन संस्था)’च्या प्रवेशासाठी घेतलेल्या त्यांच्या मुलाखतीतील एक किस्सा सांगितला. मुलाखतकर्त्याने त्यांना विचारले, ‘‘या प्रतिष्ठित संस्थेत प्रवेश का घ्यायचा आहे ?’’ त्यावर श्री. संजीव यांचे उत्तर होते, ‘‘भगवद्गीतेचा प्रचार करण्यासाठी.’’ कुतूहलाने मुलाखतकर्त्यांच्या ‘पॅनेल’ने (मंडळाने) आणखी काही प्रश्न विचारले. पॅनलचे सदस्य म्हणाले, ‘‘मग ते काम लगेच का चालू करू नये ?’’, त्यावर श्री. संजीव नेवर यांनी उत्तर दिले, ‘‘मला आय.आय.एम्.मध्ये प्रतिष्ठेसाठी नव्हे, तर गीतेचे खरे सार सर्वांत बुद्धीमान लोकांपर्यंत पोचण्यास साहाय्य करील, यासाठी प्रवेश हवा आहे.’’ या घटनेनंतर २ वर्षांनी त्यांनी ‘आय.आय.एम्., कोलकाता’ येथून पदवी प्राप्त केली.

श्री. संजीव नेवर

विशेष सदर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यासाठी मावळे आणि शिलेदार यांनी केलेला त्याग सर्वोच्च आहे, त्याप्रमाणे आजही अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिक धर्म-राष्ट्र यांच्या रक्षणासाठी ‘शिलेदार’ म्हणून कार्य करत आहेत. आजच्या सदरात आपण श्री. संजीव नेवर यांनी वेदांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी केलेले कार्य आणि अन्य विविध स्तरांवर केलेल्या कार्याविषयी जाणून घेऊया ! – संपादक

१. ‘डेटा सायन्स’पेक्षा धर्माची निवड करणारे विद्वान

बौद्धिक गोंधळाच्या आणि अस्वस्थ करणार्‍या सध्याच्या काळात श्री. संजीव नेवर हे तीक्ष्ण बुद्धी आणि अतूट इच्छाशक्ती घेऊन कार्य करत आहेत. ‘आय.आय.टी.’ (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी – भारतीय तंत्रज्ञान संस्था) आणि ‘आय.आय.एम.’ या दोन्ही प्रतिष्ठित संस्थांचे श्री. संजीव नेवर हे माजी विद्यार्थी आहेत. सर्व भौतिक जग त्यांच्या पायावर उभे होते. ‘डेटा सायन्स’मधील एक आशादायक कारकीर्द, ‘कॉर्पोरेट’ (व्यावसायिक) जगतातील लाभदायी प्रस्ताव आणि उच्च पदव्या मिळवून मिळणारी प्रतिष्ठा, हे सर्व त्यांच्यापाशी होते. (‘डेटा सायन्स’ म्हणजे माहितीचे संकलन, विश्लेषण आणि अंतर्निहित पद्धती शोधण्यासाठी विविध तंत्र आणि पद्धती यांचा वापर करणे.) तरीही त्यांनी पूर्णपणे वेगळा मार्ग निवडला. ‘वेदांचे पुनरुज्जीवन करणे, वैदिक संस्कृतीचा प्रसार करणे आणि धर्मविरोधी शक्तींचा पर्दाफाश करणे’, हे कार्य त्यांनी निवडले.

बॉलीवूडचा राष्ट्रविरोधी आणि हिंदुविरोधी चेहरा उघड केला !

श्री. संजीव नेवर हे ‘जेम्स ऑफ बॉलीवूड’ या सांस्कृतिक चळवळीचे संस्थापकही आहेत. या चळवळीने भारतातील सर्वांत मोठ्या चित्रपट निर्मिती उद्योगात खोलवर रुजलेल्या ‘हिंदूफोबिया’ (हिंदुद्वेष), ‘स्त्रीद्वेष’ आणि राष्ट्रविरोधी कथा यांचा पर्दाफाश केला आहे.

सामाजिक माध्यमांवर प्रसारित होणारी मालिका म्हणून जी चालू झाली, ती लवकरच लोकजागृतीचे माध्यम बनली. त्यामुळे बॉलीवूड या हिंदी चित्रपटसृष्टीतील उच्चभ्रू लोकांना सार्वजनिक प्रतिक्रियेचा सामना करावा लागला. ‘जेम्स ऑफ बॉलीवूड’ने बॉलीवूडमध्ये लपलेली वैचारिक अंदाधुंदी उघड करून ‘ग्लॅमर’चा (मोहिनी रूपाचा) भ्रम मोडून काढला. विरोधकांच्या कामावर प्रश्न उपस्थित करू शकेल, अशी एक पिढी जागृत केली.

२. धर्माचा आवाज झालेले श्री. संजीव नेवर !

फसव्या धर्मांतराविरुद्ध श्री. संजीव नेवर यांनी अथक मोहिमा आखल्या. या मोहिमांमुळे त्यांना राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली. विशेषतः आतंकवाद्यांना निधी पुरवणारा आणि विद्वेषी भाषणे करणारा हिंदुद्वेष्टा डॉ. झाकीर नाईक याच्या विरोधात श्री. नेवर यांनी आवाज उठवला. श्री. नेवर यांनी अग्नी समाजाविषयी पसरलेले चुकीचे समज नष्ट केले. वैदिक धर्म अत्यंत स्पष्टतेने सर्वांसमोर सादर केला. त्यांच्या ‘अग्नी समाज’ या उपक्रमांतर्गत स्थापन झालेल्या या चळवळीने अभूतपूर्व साहित्य, प्रसारित होणार्‍या डिजिटल मोहिमांसाठी केलेले लेखन आणि सहस्रो तरुण मनांना बौद्धिक स्तरावर आध्यात्मिक जागृतीसाठी मार्गदर्शन यांद्वारे दृढ आकार घेतला आहे. यात प्रबोधन केलेल्यांमध्ये एकेकाळी झाकीर नाईकसारख्या व्यक्तींच्या धर्मांतराच्या प्रचाराला भुललेल्या अनेकांचा समावेश आहे.

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून ‘सांस्कृतिक योद्धा’ पुरस्कार स्वीकारतांना श्री. संजीव नेवर (डावीकडे)

३. प्रत्यक्ष कार्य करण्यावर भर

श्री. संजीव नेवर हे केवळ सिद्धांतवादी नाहीत. प्रत्यक्षातील परिवर्तन कार्याच्या स्तरावर घडते, असा त्यांचा विश्वास आहे. या विश्वासामुळे त्यांनी ‘सेवा न्याय उत्थान फाऊंडेशन’ची स्थापना केली. फाऊंडेशनने शेकडो पाकिस्तानी हिंदु निर्वासित कुटुंबांचे पुनर्वसन करण्यास साहाय्य केले आहे. त्यांच्या देखरेखीखाली फाऊंडेशनने निर्वासित मुलांना ‘मार्शल आर्ट्स’चे प्रशिक्षण दिले आहे. या विद्यार्थांना जयपूर (राजस्थान) येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील कराटे स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य पदके जिंकता आली अन् इतिहास रचला गेला.

४. अत्यंत दुर्लक्षित भागांमध्ये तंत्रज्ञानाच्या साहाय्याने क्रांती

श्री. नेवर यांच्या मार्गदर्शनाखाली फाऊंडेशनने ‘स्टेम’ शिक्षणातही (STEM education – encompasses teaching and learning in Science, Technology, Engineering and Mathematics – विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणिती शिक्षण) उल्लेखनीय टप्पे गाठले आहेत. त्यांनी पाकिस्तानी निर्वासित हिंदु मुलांच्या ‘रोबोटिक्स’च्या प्रशिक्षणाचे नेतृत्व केले. या यशाने प्रेरित होऊन त्यांनी उत्तरप्रदेशातील सर्वांत मागास जिल्ह्यांपैकी एक असलेल्या संभल येथील सरकारी शाळांमध्ये दिव्यांग आणि वंचित मुलांसाठी अशाच प्रकारचे प्रशिक्षण चालू केले. मार्च २०२५ मध्ये श्री. संजीव नेवर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतलेल्या इयत्ता ५ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांनी ‘आय.आय.टी. दिल्ली’तील ३५ अभियांत्रिकी संघांमध्ये चौथे स्थान मिळवले. हा असा एक पराक्रम झाला की, त्यामुळे सर्वांत अनुभवी तंत्रज्ञान मार्गदर्शकही चकित झाले.

पाकिस्तानी निर्वासित हिंदु मुलींसमवेत (१) श्री. संजीव नेवर

५. वेदांचे पुनरुज्जीवन करणारी चळवळ

श्री. संजीव नेवर यांची दृष्टी समाजसेवेच्या पलीकडे आहे. ते म्हणतात, ‘‘वैदिक विद्वानांनी शिक्षण, नैतिकता, नेतृत्व आणि नवनिर्मितीला मार्गदर्शन केले पाहिजे.’’ ‘अग्नी समाजां’तर्गत त्यांचा प्रमुख उपक्रम, वेद आणि संस्कृत ‘मास्टर क्लास’ (अतिशय हुशार विद्यार्थ्यांसाठी घेतला जाणारा वर्ग), हा विश्वास प्रतिबिंबित करतो. श्री. नेवर तत्त्वांचा वापर करून प्राचीन धर्मग्रंथ शिकवतात, साधकांना तर्कशास्त्र, भाषा आणि जिवंत अनुभवांद्वारे धर्म समजून घेण्यास साहाय्य करतात. सहस्रो लोकांनी ही सत्रे आधीच घेतली आहेत आणि त्यांना त्यांच्या प्रवासातील एक निर्णायक टप्पा म्हटले आहे. एका विद्यार्थ्याने श्री. संजीव नेवर यांच्या कार्याविषयी सामाजिक माध्यमांवर लिहिले, ‘संजीवजी यांचे वर्ग इतके समृद्ध आहेत की, त्यांनी आणखी २ घंटे बोलावे, अशी माझी इच्छा आहे ! त्यांच्याकडून शिकण्यासारखे पुष्कळ काही आहे.’

वेदांमधील सर्वोच्च ज्ञान आणि मार्गदर्शक तत्त्वे यांमुळे प्रेरणा मिळाली !

श्री. संजीव नेवर यांना ‘एवढे महान कार्य करण्यासाठी कशामुळे प्रेरणा मिळाली ?’, याविषयी ते म्हणतात, ‘तो एक सत्याचा खोलवरचा शोध होता. शाळेत अव्वल विद्यार्थी असतांनाही मी माझा बराचसा वेळ वेगवेगळ्या परंपरांमधील धार्मिक ग्रंथ वाचण्यात घालवला. विशेषतः मी खुल्या मनाने विविध धर्मांचा शोध घेतला, त्या सर्वांना समजून घेण्याची उत्सुकता होती. त्या प्रवासाने अखेर मला वेदांकडे नेले, ज्यामध्ये मला जीवनासाठी सर्वोच्च ज्ञान आणि मार्गदर्शक तत्त्वे आढळली. ‘मोक्ष’ हे माझे अंतिम ध्येय आहे. या श्रद्धेने मी जे काही करतो, ते माझ्या वैयक्तिक निवडींपासून संपूर्ण जगातील माझ्या ध्येयापर्यंत घडवले आहे.

६. शास्त्र, रणनीती आणि शौर्य यांची शक्ती असलेले संजीव नेवर !

पाणिनीचे व्याकरण उलगडणे असो, दलित वस्तीमधील मुलाला मार्गदर्शन करणे असो किंवा राष्ट्रीय दूरचित्रवाणीवरील खोट्या ‘नॅरेटिव्ह’चा (कथानकाचा) बुरखा फाडणे असो, संजीव नेवर हे शास्त्र, रणनीती आणि शौर्य परिपूर्ण असलेली एक शक्ती आहे. ते केवळ धर्मासाठी बोलत नाहीत, तर मुले अन् युवक यांचे भविष्य घडवतात.

संकलन : अग्नी समाज परिवार