
सिंधुदुर्ग – वर्ष २०१३ मध्ये वक्फ कायद्याच्या बाजूने असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचे नेते आता या कायद्यात सुधारणा होत असतांना मात्र मूग गिळून गप्प होते. त्यांनी चर्चेत सहभागही घेतला नाही. जर वर्ष २०१३ मध्ये हा कायदा याच नेत्यांनी केला होता, तर त्यात पालट होत असतांना किमान त्याविषयीच्या चर्चेत त्यांनी भाग घेणे महत्त्वाचे होते. खासदार प्रियांका वाड्रा यांनी या प्रक्रियेत मतदानही केले नाही. यावरून ‘हा कायदा चुकीचा बनवला होता’, हे स्पष्ट होते, असे मत भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी व्यक्त केले. ओरोस येथील पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई, राजू राऊळ आदी उपस्थित होते.
‘केंद्र सरकारने नुकताच वक्फ कायद्यात पालट केला आहे. लोकसभेत आणि राज्यसभेत त्याला मान्यता मिळाली आणि त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची स्वाक्षरी होऊन त्याचे कायद्यात रूपांतर झाले आहे. वक्फ कायदा करण्यात आला, तेव्हा केंद्रात डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार, तर महाविकास आघाडीच्या अध्यक्षा म्हणून सोनिया गांधी कार्यरत होत्या. त्या वेळी सभागृहात काँग्रेसचे अध्यक्ष तथा विद्यमान विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, प्रियांका वाड्रा, शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे उपस्थित होते. आता या कायद्यात पालट करतांना त्याच्या विरोधात यातील कुणीही सभागृहात भाष्य केले नाही. विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नेत्यांनी चर्चेत सहभाग घेतला नाही’, असे भांडारी यांनी म्हटले आहे.