नुकतेच अजमेर येथील एका हिंदी वृत्तपत्रात आलेली बातमी वाचनात आली. ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आय.सी.एम्.आर्.)’च्या वतीने ‘जे.एल्.एन्. मेडिकल कॉलेज, अजमेर’ आणि ‘श्रीराम इन्स्टिट्यूट’ यांच्या संयुक्त सहकार्याने करण्यात आलेल्या जिवाणूजन्य आजारांवर ‘हवन’ प्रभावी असल्याच्या संशोधनाला प्रमाणित करण्यात आले आहे. या संशोधनाच्या अधिक सखोल अभ्यासासाठी सुमारे ३० लाख रुपये संमत करण्यात आले आहेत. फेब्रुवारी २०२३ मध्ये हवनासाठी वापरण्यात येणार्या सामग्रीचे पेटंटही जारी करण्यात आले आहे.
या संशोधनानुसार जिवाणूजन्य रोग आणि त्यावरील उपचारांसाठी ‘हवन’चा धूर अन् त्याचा सुगंध रामबाण उपाय ठरत आहे. गुणवत्तापूर्ण साहित्य आणि औषधी यांचा वापर करून केलेले हवन पर्यावरणातील हानीकारक जिवाणू नष्ट करते अन् व्यक्तीची रोगप्रतिकारकशक्ती (इम्युनिटी) वाढवते. विशेषतः कोरोना आणि तत्सम रोगांपासून बचाव करण्यासाठी हवन प्रभावी ठरू शकते. या संशोधनानुसार हवन केल्यानंतर रोगकारक बॅक्टेरियांवर सकारात्मक परिणाम दिसून आला. वरील बातमी वाचल्यानंतर असे वाटले की, आपल्या हिंदु धर्मशास्त्रात अग्निहोत्र, विविध यज्ञ आणि त्यासमवेत वापरण्यात येणार्या सामग्री यांचे महत्त्व विविध ग्रंथात आढळते. अनेक संत याविषयी सांगत असतात; परंतु त्याचे महत्त्व समाजाला तेव्हाच कळते, जेव्हा वैज्ञानिक दृष्टीने त्याचे संशोधन केल्याचे प्रसिद्ध होते. सातत्याने अग्निहोत्र केल्यावर तर एवढ्या क्षमतेचे संरक्षणकवच निर्माण होते की, अणूबाँब पडल्यावर निर्माण होणार्या लहरींपासूनही संरक्षण निर्माण होते, हेही पूर्वी सिद्ध झाले आहे.
प्रत्यक्षात हिंदु धर्मशास्त्रसंमत प्रत्येक कृती ही वैज्ञानिक दृष्टीनेच ऋषिमुनींनी वेद आणि उपनिषदे यांत सांगितली आहे. केवळ हवनच नाही, तर आताच्या कलियुगातील बांधकाम, जलपरियोजना, नगरविकास इत्यादींविषयीही लिहून ठेवले गेले आहे. इतकेच काय, खगोल आणि ज्योतिष शास्त्र इथपासून शरीर अन् औषध शास्त्रापर्यंत, तसेच विमानशास्त्रापासून जहाजबांधणीपर्यंत अनेक शास्त्रांचा सखोल अभ्यास प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आहे. विदेशात प्राचीन भारतीय ग्रंथांचा आणि त्यांतील शास्त्रांचा अभ्यास केला जाऊन त्याच्या साहाय्याने तिथे वैज्ञानिक शोध लावले जात आहेत. त्यांचे संशोधन नव्याने केलेले संशोधन म्हणून पुढे येते. यासाठीच असे वाटते की, आपले धर्मशास्त्रच जर शिक्षणक्षेत्रात पुन्हा गुरुकुलाप्रमाणे कार्यान्वित केले, तर भारतातील प्राचीन शास्त्रे पुन्हा पुनर्जीवित होतील. त्यातून भारत लवकरच पुन्हा एकदा विश्वगुरु असल्याचे सिद्ध होईलच; परंतु आपली पुढची पिढीसुद्धा धर्माचरणी आणि धर्माभिमानी होईल !
– श्री. वैभव आफळे, गोवा.