‘गोरक्षण सेवा समिती निपाणी’ने कत्तलीसाठी जाणार्‍या १४ गोवंशियांना वाचवले !

कोल्हापूर – राधानगरी तालुक्यातील टिटवे येथे १४ गोवंशियांना कत्तलीसाठी नेत असल्याची माहिती ‘गोरक्षण सेवा समिती निपाणी’स समजली. या गोवंशियांना एका टेंपोमधून कत्तलीसाठी नेण्यात येत होते. यानंतर ‘गोरक्षण सेवा समिती’चे प्रमुख सागर श्रीखंडे यांनी कार्यकर्त्यांसह मुरूगुड पोलिसांच्या सहकार्याने या टेंपोचा पाठलाग करून या गोवंशियांची सुटका केली. यातील वासरांच्या तोंडाला चिकटपट्टी लावलेली आढळली. या संदर्भात सागर श्रीखंडे यांनी मुरूगुड पोलीस ठाण्यात सुहास शिवाजी सटके आणि अनिल सकट यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. हे गोवंशीय निपाणी येथील गोशाळेत पाठवण्यात आले असून मठाचे प.पू. प्राणलिंग स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा आता सांभाळ होणार आहे. या कारवाईत गोरक्षक तानाजी भरडे, सर्जेराव भाट, प्रकाश वाडकर, सागर भाट, संकेत शहा, जगदीश गुरव यांसह बजरंग दल, विश्व हिंदु परिषद यांचा सहभाग होता.