टिटवाळा येथील अल्पवयीन शाळकरी मुलगी बेपत्ता !

प्रतिकात्मक चित्र

ठाणे, ६ एप्रिल (वार्ता.) – टिटवाळा येथील बनेली परिसरातून एक १५ वर्षांची अल्पवयीन शाळकरी मुलगी रहात्या घरातून बेपत्ता झाली आहे. या मुलीच्या आई-वडिलांनी त्यांचे नातेवाईक, तसेच घर परिसरात पुष्कळ शोध घेतला; पण ती मुलगी आढळली नाही. त्यामुळे मुलीला कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याचा संशय घेत कुटुंबियांनी टिटवाळा पोलीस ठाणे येथे तक्रार केली आहे. (पोलिसांचा धाक संपल्याने छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात मुलींचे अपहरण, त्यांच्यावर बलात्कार, अत्याचार वाढीस लागले आहेत ! – संपादक)

मागील काही दिवसांपूर्वी डोंबिवली पूर्वेतील शिळफाटा भागात एका घरातील २ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहेत. डोंबिवली, कल्याण परिसरातून अल्पवयीन मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढत चालल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. गेल्या आठवड्यात शिळफाटा रस्त्यावरील रिजन्सी अनंतम गृहसंकुल परिसरात एका रिक्शाचालकाने एका बालकाचे खंडणीसाठी अपहरण केले होते. मानपाडा पोलिसांनी शिताफीने अन्वेषण करून ३ घंट्यांच्या आत बालकाची अपहरणकर्ता रिक्शाचालकाच्या तावडीतून पोलिसांनी सुटका केली होती.