भक्तीसत्संगाच्या माध्यमातून रामजन्माचा आनंद अनुभवणार्‍या नंदुरबार येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. निवेदिता जोशी !

७.४.२०२२ या दिवशी श्रीरामनवमीच्या निमित्ताने श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी विशेष भक्तीसत्संग घेतला. तो भक्तीसत्संग ऐकतांना सौ. निवेदिता जोशी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

श्रीराम

१. भक्तीसत्संग ऐकतांना जाणवलेली सूत्रे

१ अ. ‘रामजन्म होणार असल्याने पृथ्वीमातेने स्वतःला पालटले असून हिंदु राष्ट्रासाठी भारतभू सिद्ध होत आहे’, असे वाटणे : ‘सत्संगात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ म्हणाल्या, ‘‘रामजन्माचा दिवस उगवला आहे !’’ त्या क्षणी तो शुभ दिवस माझ्या डोळ्यांसमोर आला. त्या जे काही वर्णन करत होत्या, ते सर्व माझ्या डोळ्यांसमोर येत होते. ‘जणू काही ही पृथ्वी नवा जन्म घेत आहे आणि तिचा कण अन् कण पालटत आहे’, असे मला वाटले. त्या वेळी ‘रामजन्म होणार; म्हणून पृथ्वीमातेने स्वतःला पालटले. कलियुगात हिंदु राष्ट्र स्थापनेची हीच ती पहाट आहे आणि हीच ती दैवी शुभ वेळ आहे. हिंदु राष्ट्रासाठी भारतभू सिद्ध होत आहे’, असे मला वाटले.

सौ. निवेदिता जोशी

१ आ. ‘रामावतारानंतरचा अवतार (श्रीकृष्णावतार) रात्री घेऊन मी तुझा आनंद द्विगुणित करीन’, असे नारायणाने चंद्रदेवाला सांगणे : श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ रामाच्या बाललीलांचे वर्णन करत होत्या. ‘सूर्यदेव आणि चंद्रदेव यांच्यात भांडण होत आहे. सूर्यदेवाला श्रीरामाच्या बाललीला बघायच्या असल्याने तो लवकर येतो, तर चंद्रदेवालाही ते अवताररूपी बालरूप पहायचे असते. दोघांनाही श्रीराम आणि त्याच्या जन्मवेळेच्या लीला अनुभवायच्या असतात. त्या वेळी नारायणाने चंद्रदेवाला सांगितले, ‘माझा हा अवतार दुपारी असेल; परंतु मी पुढचा अवतार (कृष्णावतार) रात्री घेऊन तुझा आनंद द्विगुणित करीन.’ असे आश्वासन दिल्याने चंद्रदेवाला आनंद झाला.’

२. सत्संगात आलेल्या अनुभूती

२ अ. सत्संगात रामजन्माचे वर्णन ऐकतांना वातावरणात तुळशीचा सुगंध पसरणे : ‘रामजन्माच्या दिवशी वातावरण मंगलमय स्पंदनांनी भारित होते’, असे श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ सांगत असतांना ‘रामजन्मभूमीतून आनंदाचे कारंजे प्रक्षेपित होऊन ते संपूर्ण भूमंडलात पसरत आहे’, असे मला दिसले. यानंतर श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी सूर्यनारायणाचे वर्णन केले. सूर्यदेव सगळ्यांना रामजन्माची आनंदवार्ता देत आहे. त्या वेळी दुपारचे १२ वाजले आणि रामजन्म झाला. विष्णुरूपातील श्रीराम बालरूपात कौसल्यामातेच्या मांडीवर अवतरित झाला. तेव्हा ‘मीसुद्धा त्या ठिकाणी दासी म्हणून सेवा करत असेन’, असे मला वाटले. त्या वेळी वातावरणात तुळशीचा सुगंध पसरला होता.

२ आ. रामजन्माचा आनंद अनुभवता आल्यामुळे साधिकेला धन्य झाल्यासारखे वाटणे : श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी रामावताराचे वर्णन केले. ‘गीतरामायणा’तील ‘राम जन्मला ग सखे’, हे शब्द मूर्तीमंत रूप घेऊन समोर साकार होत आहेत’, असे मला वाटले. मिटलेल्या कळ्या पुन्हा कशामुळे उमलतात ? सर्वत्र किती आनंद आहे !’, हे सर्व गुरुदेवांच्या कृपेने मला अनुभवायला मिळाल्यामुळे मला धन्य धन्य झाल्यासारखे वाटले.

२ इ. सत्संगाच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

१. मला सत्संगात गारवा जाणवला आणि ‘सर्वत्र आनंदाची स्पंदने कार्यरत आहेत’, असे जाणवले.

२. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांची वाणी म्हणजे ‘दिव्य लोकातील स्वर असून प्रत्यक्ष श्री सरस्वतीदेवीची वाणी आहे आणि देवीच हा सत्संग घेत आहे’, असे मला वाटले.

३. कृतज्ञता

‘श्रीरामच कृष्णरूपात अवतीर्ण झाला असून तोच ‘जयंत’रूपात साधकांना आनंदाची अनुभूती देत आहे’, असे मला अनुभवता आले. सत्संग झाल्यावर ‘आज माझे मंगलापेक्षाही परम मंगल झाले’, असे मला वाटले. हे सर्व मला अनुभवायला दिले, त्याबद्दल श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करून हे भावपुष्प श्री गुरुचरणी अर्पण करते.’

– सौ. निवेदिता जोशी (वर्ष २०२४ मधील आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ५२ वर्षे), नंदुरबार, महाराष्ट्र. (२१.४.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक