प्रभु श्रीरामाच्या पादुका, म्हणजे श्रीरामस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याच चरणपादुका मस्तकावर धारण करणे

उद्या चैत्र शुक्ल नवमी (६.४.२०२५) या दिवशी श्रीरामनवमी आहे. त्या निमित्ताने…

भावजागृतीसाठी प्रयोग

‘भावजागृती’ हा साधकाचा साधनेच्या वाटचालीतील मोठा आधारस्तंभ आहे. साधकाच्या भावामुळे त्याला भगवंत विविध अनुभूती देतो, त्याचे विविध संकटप्रसंगी रक्षण करतो. असे म्हटले आहे, ‘सर्व सौभाग्यालंकारात जर कपाळावर कुंकू नसेल, तर स्त्रीच्या अन्य अलंकारांना फारसे महत्त्व रहात नाही.’ त्याचप्रमाणे भाव हा साधनेतील सौभाग्यालंकार (कपाळावरील कुंकू) आहे. ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार भगवंत पदोपदी साधकाच्या समवेत रहातो, त्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांमध्ये भावजागृती होण्यासाठी भावजागृतीचे प्रयोग करणे, भावसत्संग, तसेच भक्तीसत्संग इत्यादींच्या माध्यमातून प्रयत्न करण्यास सांगितले. नंदुरबार (महाराष्ट्र) येथील सनातनच्या साधिका सौ. निवेदिता जोशी (६१ टक्के आध्यात्मिक पातळी, वय ५२ वर्षे) यांनी भावजागृतीसाठी विविध प्रयोग केले. त्यातील भावप्रयोग येथे दिला आहे.

श्रीराम अवतार

प्रवेश : ‘जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण, विष्णुस्वरूप गुरुमाऊली (परात्पर गुरु डॉ. आठवले), सद्गुरु नंदकुमार जाधवकाका यांच्या चरणी वंदन करून भावार्चना करूया.

१. प्रभु श्रीरामाच्या पादुका अयोध्येला आणतांना भरतासमवेत साधकांनीही त्या मस्तकावर धारण करणे

आज प्रभु श्रीरामाला अयोध्येत परत आणण्यासाठी भरत चित्रकूट पर्वतावर गेला आहे. आपण सर्व साधकही त्याच्या समवेत आहोत. श्रीरामाला पुष्कळ आळवणी करूनही श्रीराम अयोध्येत परत येत नाही. तेव्हा भरत श्रीरामाकडे त्याच्या चरणपादुका देण्याची विनवणी करत आहे. प्रभूने त्याच्या चरण पादुका भरताला दिल्या. भरत त्या पादुका मस्तकावर घेऊन चित्रकूट पर्वताहून अयोध्येला निघाला आहे. वाटेमध्ये सर्वांच्या मस्तकावर त्या पादुका देत आहे.

२. श्रीरामरूपातील परात्पर गुरु डॉक्टरांच्या दिव्य पादुका मस्तकावर धारण केल्यावर कुंडलिनीचक्रांची शुद्धी होऊन मन शांत होणे

सौ. निवेदिता योगेंद्र जोशी

या दिव्य पादुका, म्हणजेच आपल्या श्रीरामरूपातील परात्पर गुरु डॉक्टरांच्या पादुका आहेत. त्या दिव्य पादुका आपण साधकांनी स्वत:च्या मस्तकावर ठेवल्यावर आपल्या पेशीपेशी चैतन्यमय होऊन सहस्रारचक्राची शुद्धी झाली आहे आणि आपले मन आज्ञाचक्रात स्थिर झाले आहे. आपल्याला मनामध्ये केवळ गुरुदेवांच्या चरणकमलांचे अस्तित्व जाणवत आहे. मनातील अनावश्यक विचार नष्ट होऊन आज्ञाचक्राच्या ठिकाणी असलेल्या बुद्धीची शुद्धी होत आहे. ‘शुद्ध बुद्धी गुरूंच्या चरणी अर्पण होऊ दे’, अशी आपण पादुकांना प्रार्थना करत आहोत. आता या पादुकांचे अस्तित्व अनाहतचक्राच्या ठिकाणी स्थिर झाले आहे. त्यामुळे अंतरंगात गारवा जाणवून आपले मन अधिकच शांत झाले आहे.

३. दिव्य पादुकांना प्रार्थना केल्यावर त्यातून आशीर्वाद स्वरूपात प्रक्षेपित होणार्‍या दिव्य सुगंधांची अनुभूती दिवसभर घेणे

आता या दिव्य पादुका भरताने त्याच्या मस्तकावर ठेवल्या आहेत. ‘हा देह, मन, बुद्धी आणि चित्त सर्व काही आपल्या चरणी लीन करून घ्या’, अशी आपण पादुकांना प्रार्थना करत आहोत. त्या वेळी पादुकांमधून आशीर्वाद स्वरूपात दिव्य सुगंध प्रक्षेपित होत असल्याचे आपल्या अंतर्मनाला जाणवत आहे. आज दिवसभर आपण हा सुगंध अंतर्मनात ठेवून गुरुदेवांचे अस्तित्व अनुभवूया आणि आपल्याला त्यांना भरतासारखे वेळोवेळी आत्मनिवेदन करायचे आहे.

श्लोक

श्रीरामचंद्रा करूणा समुद्रा ।|
ध्यातो तुझी राजस योगमुद्रा ।।

नेत्री न ये रे तुजवीण निद्रा ।
कै भेटसी बा मजला सुभद्रा ।।

अर्थ : हे श्रीरामचंद्रा, तू करुणेचा अथांग सागर आहेस. मी तुझ्या राज तेजाने युक्त अशा योगमुद्रेचे (योग साधनेतील स्थिती) ध्यान करतो. तुझ्या विरहात मला झोप लागत नाही. हे मंगलमय अशा श्रीरामा, तू मला कधी भेटशील ?

कृतज्ञता !’

– सौ. निवेदिता जोशी (वय ५२ वर्षे, वर्ष २०२४ मधील आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), नंदुरबार, जिल्हा नंदुरबार, महाराष्ट्र.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक