मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना प्रश्न

मुंबई – कोरटकर तर चिल्लर आहे; पण छत्रपती शिवाजी महाराजांविरुद्ध सर्वाधिक लिखाण पंडित जवाहरलाल नेहरूंनी केले आहे. पंडित नेहरू यांनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जे लिहिले आहे, त्याचा निषेध तुम्ही करणार आहात का ? छत्रपतींच्या विरोधात सर्वाधिक लिहिणार्या नेहरूंचाही धिक्कार झाला पाहिजे. त्यांचा निषेध करण्याची हिंमत महाविकास आघाडी दाखवणार का ? असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ मार्चला विधान परिषदेच्या सभागृहात केला. विरोधकांनी प्रशांत कोरटकर आणि अभिनेते राहुल सोलापूरकर यांना सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप केल्याने फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली.
विरोधकांच्या टीकेला उत्तर देतांना फडणवीसांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करणार्यांना सोडणार नाही. आम्ही १०० टक्के त्यांना कारागृहात टाकू; पण आमदार जितेंद्र आव्हाड काय बोलले आहेत ? औरंगजेब होता म्हणून छत्रपती शिवाजी महाराज होते. औरंगजेब बलाढ्य होता, महाराज ५ फुटांचे होते, हे त्यांचे वक्तव्य ‘रेकॉर्ड’वर आहे. त्याचा निषेध का होत नाही.