पुणे – महापालिकेने वाहतुकीचा प्रश्न आणि नागरिकांचे हित लक्षात घेऊन निर्णय घ्यावा. आवश्यकता भासल्यास पर्यावरण विभाग आणि वन विभाग यांची अनुमती घ्यावी, असा निकाल देत याचिका निकाली काढली. बालभारती ते पौड फाटा या वेताळ टेकडीवरील नियोजित रस्त्याच्या विरोधात ‘नागरी चेतना मंचा’ने उच्च न्यायालयामध्ये याचिका प्रविष्ट केली होती. त्यावर न्यायालयाने निकाल देत या रस्ता निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे.
पुणे महापालिकेच्या विकास आराखड्यात कोथरूड आणि सेनापती बापट रस्त्याला जोडण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून बालभारती ते पौड फाटा रस्ता दाखवण्यात आला होता. या कामासाठी सल्लागार नेमण्यात आले. त्यांनी या परिसराचा अभ्यास करून अहवाल महापालिकेला सादर केला. या रस्त्यासाठी २५२ कोटी १३ लाख रुपये इतका व्यय होणार आहे.
पर्यावरणाचा र्हास म्हणून विरोध !
हा मार्ग हनुमान टेकडी आणि ए.आर्.ए.आय. टेकडीच्या भागातून जाणार आहे. या भागात भूमीखाली भूजलक्षेत्रांचे प्रमाण अधिक आहे. रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणावर वनसंपदा आणि वृक्ष तोडावे लागणार आहेत. त्यामुळे या भागातील जैवविविधतेला धोका पोचेल, अशा विविध कारणांमुळे या रस्ता प्रकल्पाला पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक यांनी विरोध केला होता.
या प्रकल्पाची २० वर्षांपासून केवळ चर्चा !
कर्वे रस्ता, सेनापती बापट रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता या ३ रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण अल्प करण्यासाठी महापालिकेने बालभारती ते पौड फाटा या दरम्यान वेताळ टेकडीवरून मार्गाचे नियोजन केले होते. या मार्गाची चर्चा गेल्या २० वर्षांपासून होत आहे. प्रत्यक्षात या कामाला केव्हा प्रारंभ होऊन पूर्ण होईल, हे सांगणे कठीणच आहे.