मराठी भाषेला आंतरराष्ट्रीय आणि मनामनात स्थान मिळवून देण्यासाठी करावयाचे प्रयत्न !

आज ‘मराठी भाषा गौरवदिन’ आहे. त्या निमित्ताने…

‘ज्ञानपीठ’ पुरस्कार विजेते ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त २७ फेब्रुवारी हा दिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. मराठी ही भारतातील २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे. महाराष्ट्राची अधिकृत, तर गोवा राज्यात सहअधिकृत दर्जाची भाषा आहे. मायबोली मराठी भाषेला ‘अभिजात (समृद्ध) भाषा’ हा दर्जा केंद्र सरकारने देऊन जगभरातील मराठी भाषिकांना सुखद धक्का दिला. या ऐतिहासिक निर्णयानंतरचे पहिले मराठी साहित्य संमेलन भारताची राजधानी देहलीत २१ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत पार पडले. हे साहित्य संमेलन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले, हे महाआनंदाचे होते आणि एक नवा इतिहास रचला गेला.

अतीप्राचीन काळापासून प्रचलित मराठी भाषा सर्वांगाने दुर्लक्षितच राहिली होती; पण आता मात्र मराठीचा प्रसार हा कुणीही रोखू शकत नाही. भारताचे थोर राजे शिवछत्रपती यांच्या राज्याभिषेकास ३०० वर्षे, रा.स्व. संघाचे शताब्दी वर्ष, तसेच भारतीय राज्यघटनेस ७५ वर्षे झाली. या सगळ्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर मराठी भाषेस अभिजात दर्जा मिळाला, हेही महत्त्वाचे आहे.

१. मराठी भाषेला आदर सन्मान मिळवून देण्यासाठी…

असे असले, तरी या मायबोली मराठी भाषेला योग्य तो आदर सन्मान मिळतो का हो ? तर याचे उत्तर ‘नाही’, हेच आहे. मराठी भाषेचा वापर आणि आदर हा काही ठराविक व्यक्तींकडूनच केला जातो, इतरांना मात्र ‘इंग्रजीत बोलले, इंग्रजांसारखा पेहराव करून शहाणपणा मिरवण्यातच जीवनाच सार्थक होईल’, असे वाटते. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. इथे संतांचे जीवनास मार्गदर्शन करणारे अनेक ग्रंथ, तसेच एकाहून एक अशा लेखकांचे संपूर्ण जीवनाला दिशा देणारे, जीवन समृद्ध करणारे असे साहित्य उपलब्ध असतांना तो ते दुर्लक्षित ठेवून इतर देशवासियांचे जीवनचरित्र वाचतो अन् त्यांना आदर्श मानतो.

मराठी भाषा वापरात हवी, लेखनात हवी, शासकीय कामकाजात हवी, संदेशवहन आणि संभाषण यांतही हवी. भाषा सांभाळणे, नवीन युगानुसार, पालटत्या जीवनशैलीनुसार विकसित करणे, ती समृद्ध करून उच्च स्तरावर नेऊन ठेवणे, हे आपले दायित्वच नव्हे, तर कर्तव्यही आहे. शासनस्तरावर मराठी भाषा ‘अभिजात दर्जा’ हा निर्णय तर झाला, त्याची कार्यवाही म्हणून आता भारतातील सर्व विद्यापिठांमध्ये मराठी भाषा संवर्धन, शिक्षण यांसाठी प्रयत्न केले जात आहेत. मराठीचे सखोलपणे अध्ययन, संशोधन चालू झाले आहे. नवनवीन प्राध्यापक, कर्मचारी वर्गाची नियुक्ती विद्यापीठ स्तरावरून हे कार्य देशात आणि जगभरात पसरेल.

श्री. प्रसाद पुरुषोत्तम निशाणदार

२. मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी घरातून प्रारंभ करा !

मराठी भाषेला राजाश्रय तर मिळाला; पण खर्‍या अर्थाने तिला आंतरराष्ट्रीय आणि मनामनात स्थान मिळवून द्यायचे असेल, तर त्याचा प्रारंभ आपल्या सर्वांच्या घराघरांतून व्हायला हवा. सर्वप्रथम अत्यावश्यक असेल, तेवढे सोडून इतर सर्व ठिकाणी संभाषण मराठीतून करणे, हे आपले प्रथम कर्तव्य आहे. मराठी वाचन, लेखन, मराठी काव्य प्रतिभेस प्रोत्साहन, मराठी नाटक, चित्रपटास वाव देणे, हे आपले उत्तरदायित्व आहे. या व्यतिरिक्त मराठी शाळेत शिक्षणास प्राधान्य, मराठी साहित्य प्रतिभेस भरभरून प्रतिसाद, मराठी चित्रपटांस गर्दी, मराठी भाषा सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा यांस आवर्जून उपस्थित रहाणे. एवढेच नव्हे, तर प्रत्येक मराठी भाषिक खेळाडू, कलाकार, गायक, नर्तक, संगीतकार, गीतकार अशा सर्व क्षेत्रांत अभूतपूर्व प्रोत्साहन देणे, साथ देणे आणि सर्वतोपरी सहकार्याची भूमिका अत्यंत आवश्यक आहे.

परप्रांतीय विक्रेत्यांकडून पदार्थ घेण्याऐवजी मराठी माणसाकडून ते घेणे, तसेच मराठी नाटक, चित्रपट पहाणे, मराठी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चात हातभार लावणे, अशा अनेक मार्गांनी मराठी भाषा केवळ देशातच नव्हे, तर जगात शिरपेचात मानाचा तुरा म्हणून चमकेल. त्यासाठी आपण आपली मरगळ झटकून विसरलेले कर्तव्य पार पाडायला हवे.

३. मराठी भाषा ही आंतरराष्ट्रीय चळवळ बनावी !

मराठी भाषेच्या गौरवशाली इतिहासावर केवळ गप्पा मारत बसण्यापेक्षा भाषा अधिकाधिक समृद्ध होण्यावर आणि तिचा प्रसार करण्यावर लक्ष केंद्रित करून आपण त्या अनुषंगाने कार्य केले पाहिजे. आज मराठी भाषेला ‘अभिजात दर्जा’ मिळाला, याचा आनंद साजरा करण्यापेक्षा आजपासून आपण स्वतःचे उत्तरदायित्व लक्षात घेऊन कर्तव्य पाडले पाहिजे. आपल्याच प्रामाणिक प्रयत्नांनी येत्या भविष्यकाळात लवकरच मराठी भाषा ही आंतरराष्ट्रीय चळवळ बनल्याविना रहाणार नाही.

– श्री. प्रसाद पुरुषोत्तम निशाणदार, जळगाव (२४.२.२०२५)