पुणे येथील सनातनच्या १२३ व्या संत पू. (सौ.) मनीषा महेश पाठक यांची पुणे येथील साधकांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

१. श्री. रघुनाथ ढोबळे, भोसरी, पुणे.
१ अ. साधकांना आधार देणे : ‘जानेवारी २०२५ मध्ये माझी पत्नी आजारी पडल्यावर मी त्याविषयी पू. मनीषाताईंना कळवले. तेव्हा मला त्यांनी नामजपादी उपाय करण्यास, तसेच काही साहाय्य लागल्यास संपर्क करण्यास सांगितले. त्या वेळी मला माझे नातेवाईक आणि मित्र यांच्यापेक्षाही पू. ताईंचा मोठा आधार वाटला.’
२. श्री. श्रीकांत बोराट, पुणे
२ अ. साधकांच्या मनातील विचार ओळखून त्यांना साहाय्य करणे : ‘एकदा मी पू. मनीषाताईंना पुण्याहून सातारा येथे चारचाकी वाहनाने घेऊन जात होतो. तेव्हा ‘मला वाहन नीट चालवता येईल ना ?
पू. ताईंना त्रास होणार नाही ना ?’, असे विचार माझ्या मनात येऊन मला ताण आला. तेव्हा पू. ताई मला म्हणाल्या, ‘‘दादा, तुमच्या नेहमीच्या पद्धतीने वाहन चालवा.’’ त्यामुळे माझ्या मनावरील ताण लगेच नाहीसा झाला.’
३. श्री. अमोल मेहता, पुणे
३ अ. सेवेची तळमळ
१. ‘पू. ताईंना रात्री झोपायला कितीही विलंब झाला, तरी त्या सेवा पूर्ण करतात.
२. पू. ताई परिणामाचा अभ्यास करूनच सेवेतील सूत्रांविषयी निर्णय घेतात. त्यांच्याकडून ही प्रक्रिया जलद गतीने होते.
३ आ. साधकांना साधनेत साहाय्य करणे
१. पू. ताई साधकांशी त्यांच्या साधनेच्या प्रयत्नांविषयीच बोलतात. ‘संबंधित साधक आनंदी आहे का ? त्याचे व्यष्टी साधनेचे प्रयत्न होत आहेत का ?’, यांकडे त्यांचे लक्ष असते.
२. ‘साधकांचे साधनेतील अडचणींवर मात करून साधनेचे प्रयत्न व्हावेत’, यासाठी पू. ताई साधकांना आध्यात्मिक स्तरावर साहाय्य करतात.
३. पू. ताई ‘साधकाचे कौशल्य, त्याची क्षमता’ इत्यादींचा विचार करून त्याचे साधनेचे प्रयत्न वाढवण्यासाठी त्याला साहाय्य करतात.
३ इ. पू. (सौ.) मनीषा पाठक यांच्यातील संतत्वाची अनुभूती येणे
१. पुणे येथे झालेल्या प्रांतीय हिंदु राष्ट्र-अधिवेशनाच्या वेळी त्यांनी ‘२ प्रिंटर्सची (मुद्रकांची) आवश्यकता भासेल’, असे मला सांगितले होते. अधिवेशनाच्या आदल्या दिवशी एका प्रिंटरला अडचण आली. तेव्हा मला दुसरा प्रिंटर आणण्याचे नियोजन करावे लागले.
२. एक साधिका प्रवासात असतांना तिच्या चारचाकी वाहनाचा अपघात झाला होता. त्या वेळी पू. ताईंना तिची आठवण येत होती. दुसर्या क्षणी पू. ताईंना त्या साधिकेचा अपघात झाल्याविषयी भ्रमणभाष आला.’
४. श्री. पराग गोखले (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ५४ वर्षे), पुणे
४ अ. प्रेमभाव
१. ‘पुणे येथील सेवाकेंद्रात आलेल्या प्रत्येक साधकाला त्या ‘प्रसाद घेतला ना ?’, असे प्रेमाने विचारतात.
२. पू. ताईंमध्ये असणार्या निरपेक्ष प्रेमभावामुळे त्यांनी माझ्या चुका सांगितल्यावर मला निराशा न येता कृतज्ञताच वाटते.
४ आ. त्यांना तीव्र शारीरिक त्रास होत असतांनाही त्या भावस्थितीत असतात.
४ इ. त्या एकाच वेळी अनेक सेवा हसतमुखाने आणि सहतेने करतात.
४ ई. पू. ताई स्वतः संत असूनही शिष्यभावात राहून साधनेचे प्रयत्न करतात.’
५. सौ. अनुराधा तागडे (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६९ वर्षे), पुणे
अ. ‘पू. ताई संत असूनही स्वतःकडे न्यूनता घेतात. त्या समष्टी सेवेतील अडचणींविषयी साधकांचे मत नम्रपणे जाणून घेतात.
आ. मी पू. ताईंशी बोलल्यानंतर मला हलकेपणा जाणवतो आणि माझा उत्साह वाढतो, तसेच त्यांच्यातील चैतन्यामुळे माझे मन सकारात्मक होते.’
(लिखाणातील सर्व सूत्रांचा दिनांक : १२.२.२०२५)
पू. (सौ.) मनीषा महेश पाठक यांनी साधकांना समष्टी साधनेविषयी केलेले अमूल्य मार्गदर्शन१. ‘सेवेतील प्रत्येक सूत्राचे नियोजन साधकांना स्पष्ट असेल, तर त्यांचा सेवेतील सहभाग वाढतो. २. सेवेतील योग्य कृती साधकांच्या लक्षात आणून दिली, तर सेवेत चुका होण्याचे प्रमाण अल्प असते आणि साधकही घडतो.’ संग्राहक : श्री. अमोल मेहता, पुणे (१२.२.२०२५) |
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |