रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात नवरात्रोत्सवामध्ये ९.१०.२०२४ या दिवशी झालेल्या श्री शाकंभरीदेवीच्या यज्ञाच्या वेळी रामनाथी आश्रमातील साधक श्री. गिरिधर वझे यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती येथे दिल्या आहेत.

१. यज्ञाला आरंभ होण्यापूर्वी आणि यज्ञाचा मध्यंतर
अ. श्री शाकंभरीदेवीच्या यज्ञाला आरंभ होण्यास काही वेळ असल्याने मी प्राणशक्तीवहन पद्धतीनुसार माझ्या प्रत्येक कुंडलिनी चक्रावर न्यास करून स्वतःवरील अनिष्ट शक्तीचे आवरण काढले. त्या वेळी ढेकरांद्वारे काळी शक्ती स्वतःच्या देहातून निघून गेल्याचे मला जाणवले.
आ. सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ते साधक सर्वश्री निषाद देशमुख आणि राम होनप, तसेच श्री. विनायक शानभाग यांनी यागाच्या मध्यंतराच्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म गुरु डॉ. आठवले, तसेच श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याप्रति भक्तीभाव जागृतीपर अन् ज्ञानदायी सूत्रे सांगितली. ती ऐकतांना माझे मन स्थिर आणि आणखी अंतर्मुख झाले.

२. यज्ञाला आरंभ झाल्यावर
अ. सभागृहातील मोठ्या पडद्याद्वारे (‘प्रोजेक्टरच्या स्क्रीन’द्वारे) यज्ञस्थळी असलेल्या देवीस्वरूप श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, तसेच श्री शाकंभरीदेवी यांचे दर्शन होत होते. तेव्हा मनात शरणागतभाव आणि समर्पणभाव यांची स्थिती बराच वेळ टिकून होती.
आ. पुरोहितांचे मंत्रपठण ऐकतांना मंत्रातील शक्ती आणि चैतन्य यांमुळे काही मंत्रांच्या अर्थानुरूप माझी भावजागृती होत होती.
इ. यज्ञस्थळी पुरोहित करत असलेले मंत्रपठण, तसेच देवीस्वरूप श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ आदींना पहातांना पडद्यामधून माझ्या आज्ञाचक्रावर तुषारासम चैतन्यदायी लहरी येऊन त्या आज्ञाचक्रासह संपूर्ण चेहर्यावर प्रक्षेपित होत होत्या.
३. यज्ञाच्या समाप्तीच्या वेळी
अ. साधिका सौ. सायली करंदीकर आणि कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १७ वर्षे) संस्कृत भाषेतील श्री शाकंभरीदेवीची आरती म्हणत असतांना माझे मन स्थिर राहून माझा उत्कट भाव जागृत झाला.
आ. देवीस्वरूप श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ या सर्व साधकांना आरती ग्रहण करायला देण्यासाठी जागेवरून प्रदक्षिणाकृती फिरत असतांना ‘त्या कृपादृष्टीने सर्व साधकांना न्याहाळत आहेत’, असे मला जाणवले.
इ. पुरोहित श्री. सिद्धेश करंदीकर यांनी यज्ञाच्या शेवटी गुरुदेव आणि श्रीविष्णु यांचे स्मरण करतांना ‘जहां जहां ये मन जाए मेरा ।’ हा हिंदी भाषेतील श्लोक म्हणतांना ‘गुरुदेवा, माझे मन जेथे जेथे जाईल, त्या त्या ठिकाणी मला तुमचे अस्तित्व अनुभवता येऊ दे’, अशी प्रार्थना शरणागतभावाने आपोआप झाली.
ई. यज्ञस्थळी देवतांचे दर्शन घेण्यासाठी गेल्यावर यज्ञकुंडातील अग्निदेवाच्या चरणी शरणागतभावे नमन करतांना गुरुकृपेने यज्ञकुंडातून धूर माझ्या दिशेने आपोआप येत होता. नंतर यज्ञस्थळी ठेवलेले सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे छायाचित्र, श्री दुर्गादेवी आणि श्री शाकंभरीदेवी यांची चित्रे यांना प्रदक्षिणा घालतांना पुन्हा माझ्याकडे धूर आला. त्या वेळी मला श्री अग्निदेवाच्या प्रीतीबद्दल मनोमन कृतज्ञता वाटली.
उ. यज्ञस्थळी देवतांसमोर मस्तक टेकवून वंदन करतांनाही माझे मन निर्विचार होते. तेव्हा सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव, त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ, तसेच मला साधना अन् समष्टी सेवा करण्याविषयी मार्गदर्शन करणारे सनातनचे संत अशा गुरुपरंपरेचे स्मरण होऊन मनोमन त्यांना वंदन केले गेले.
४. अकस्मात् संतसेवा मिळाल्यावरही मन स्थिर आणि सहजभावात रहाणे
सनातनचे विकलांग अवस्थेतील संत पू. संकेत कुलकर्णी यांना यज्ञस्थळी देवतांच्या दर्शनासाठी चाकांच्या आसंदीतून नेण्याची सेवा मला अकस्मात् मिळाली. त्या वेळी गुरुकृपेने माझे मन स्थिर आणि सहजभावात होते.’
– श्री. गिरिधर भार्गव वझे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.१०.२०२४)
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |