India Bangladesh Relations : (म्हणे) ‘भारताला बांगलादेशाशी कोणत्या प्रकारचे संबंध हवे आहेत हे ठरवावे लागेल !’ – बांगलादेश

परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर यांच्या विधानावर बांगलादेशाचे उद्दाम उत्तर

भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर व बांगलादेशाच्या अंतरिम सरकारमधील परराष्ट्र सल्लागार तौहीद हुसेन

ढाका (बांगलादेश) – भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी ‘बांगलादेशाला भारताशी कोणत्या प्रकारचे संबंध हवे आहेत हे ठरवावे लागेल’, असे विधान केले होते. त्यावर बांगलादेशाच्या अंतरिम सरकारमधील परराष्ट्र सल्लागार तौहीद हुसेन यांनी उद्दामपणे प्रत्युत्तर देतांना म्हटले की, यासंदर्भात आमचा निर्णय अगदी स्पष्ट आहे. आम्हाला भारतासमवेत परस्पर आदर आणि हितसंबंध यांवर आधारित चांगले कामकाजाचे संबंध हवे आहेत. भारताला बांगलादेशाशी कोणत्या प्रकारचे संबंध हवे आहेत, हे ठरवावे लागेल.

१. आमचे लक्ष संबंध सुधारण्यावर !

हुसेन पुढे म्हणाले की, डॉ. जयशंकर यांनी ‘बांगलादेश सरकारमधील लोक भारताविरुद्ध काही टिपण्या करत आहेत’, असे विधान केले आहे. दोन्ही बाजूंनी अशा प्रकारच्या टिपण्या केल्या जात आहेत. एक भारतीय मंत्री सतत विधाने करत आहे. अशा प्रकारच्या टिपण्या येत रहातील हे गृहित धरून आम्ही संबंध विकसित करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे काहीही बोलले जात असले, तरी आमचे लक्ष केवळ दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर आहे.

२. माजी पंतप्रधान शेख हसीना यांची विधाने आगीत तेल ओतण्यासारखी !

माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या विधानाचा संदर्भ देत तौहीद हुसेन म्हणाले की, भारताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात आमच्या माजी पंतप्रधानांनी बांगलादेशातील सरकारविरोधात केलेली विधाने दोन्ही देशांमधील संबंधांसाठी खरोखरच हानीकारक आहेत. बांगलादेशाला त्याच्या प्रदेशातील अस्थिरतेचा सामना करावा लागत आहे. तथापि आमच्या माजी पंतप्रधानांचे भाषण आगीत तेल ओतत असल्याचे सिद्ध झाले आहे. हे सर्वांना ठाऊक आहे.

संपादकीय भूमिका

भारताच्या जिवावर जगणार्‍या बांगलादेशाला त्याची खरी लायकी दाखवण्याचे धाडस भारत कधी दाखवणार ?

(म्हणे) ‘भारताचा बांगलादेशातील अल्पसंख्यांक समुदायाशी काहीही संबंध नाही !’

एका प्रश्‍नाच्या उत्तरात हुसेन म्हणाले की, डॉ. जयशंकर यांनी पुन्हा एकदा बांगलादेशातील अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेबद्दल विधान केले. बांगलादेशातील अल्पसंख्यांकांबद्दलच्या बातम्यांसाठी भारतीय माध्यमे उत्तरदायी आहेत. भारताचा बांगलादेशातील अल्पसंख्य समुदायाशी काहीही संबंध नाही. हे बांगलादेशाचे अंतर्गत सूत्र आहे. भारतातील अल्पसंख्य समुदाय त्यांच्यासाठी चिंतेचा विषय आहे. या सूत्रावर आपण दोघांनाही एकमेकांमध्ये हस्तक्षेप न करण्याचे धोरण स्वीकारावे लागेल. आम्ही बांगलादेशातील अल्पसंख्य समुदायांशी संबंधित समस्यांवर गांभीर्याने विचार करत आहोत.

संपादकीय भूमिका

बांगलादेशातील हिंदूंवर होणारी आक्रमणे केवळ देशाचा प्रश्‍न नाही, तर तो धर्माचा प्रश्‍न आहे; कारण त्यांच्यावर हिंदु म्हणून आक्रमणे केली जात आहेत. ‘जगभरात कुठेही हिंदूंवर हिंदु म्हणून आक्रमण केली जात असतील, तर भारत त्याविरोधात आवाज उठवणारच’, असे भारताने ठासून सांगितले पाहिजे !