छत्रपती संभाजीनगर ब्राह्मण महिला मंच, घे भरारी फेसबुक ग्रुप आणि यशस्वी उद्योजिका समूह यांचे संयुक्त आयोजन !
छत्रपती संभाजीनगर – विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान १०० महिलांना ब्राह्मण महिला मंच, ‘घे भरारी फेसबुक ग्रुप’ आणि ‘यशस्वी उद्योजिका समूह’ यांच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप प्रमाणपत्र, शेला, स्मृती चिन्ह असे होते. या वेळी व्यासपिठावर परळीचे माजी नगराध्यक्ष अमृत संस्थेचे सल्लागार श्री. बाजीराव भैया धर्माधिकारी, परशुराम हिंदु सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष तथा अमृत संस्थेचे सल्लागार श्री. विश्वजीत देशपांडे, माजी उपमहापौर श्री. संजय जोशी, भाजप महिला मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस सौ. अमृता पालोदकर, ब्राह्मण महिला मंचच्या अध्यक्षा सौ. विजया कुलकर्णी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
या वेळी विविध क्षेत्रांतील महिलांना सेवारत्न, समाजरत्न, शिक्षणरत्न, आरोग्यरत्न, कलारत्न आणि उद्योगरत्न असे विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात आले विशेष म्हणजे या कार्यक्रमात २ बंधूंनाही गौरवण्यात आले. श्री. अनिल डोईफोडे आणि श्री. राजेंद्र पोद्दार वसमत यांचाही समाजरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
या वेळी बोलतांना श्री. बाजीराव धर्माधिकारी म्हणाले, ‘‘आपली संस्कृती टिकवून व्यवसाय करण्यात उपस्थित महिला अग्रेसर आहेत. समाजाच्या उन्नतीसाठी स्त्रियांची उन्नती फार महत्त्वाची आहे; कारण स्त्री आपल्या पायावर उभी झाली, तर आपोआप घर समृद्ध होते. ब्राह्मण महिला मंच करत असलेल्या कार्याचा गौरव त्यांनी केला.’’
श्री विश्वजीत देशपांडे म्हणाले, ‘‘अमृत संस्थेच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांना बळ मिळणार आहे. तरुण-तरुणी व्यावसायिक महिला अशा सर्व घटकांनी योजनांचा लाभ घ्यावा. सरकारने या वर्षी १०० कोटी रुपयांच्या योजना केल्या आहेत. स्वातंत्र्योत्तर इतिहासात असे पहिल्यांदाच घडत आहे.’’