थोडक्यात महत्त्वाचे : दौंड येथील महिलेची मुलुंड येथे आत्महत्या !, विद्यार्थ्यांच्या शालेय बसची भाडेवाढ !…

दौंड येथील महिलेची मुलुंड येथे आत्महत्या !

मुंबई – पुण्यातील दौंड येथील सुनीता येवले या ५३ वर्षीय महिलेने ४ फेब्रुवारीला मुलुंड येथील इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारली. मधुमेह, हृदयविकार आणि डोळ्यांशी संबंधित समस्यांसह आरोग्याच्या अनेक समस्यांशी त्या झुंज देत होत्या. मधुमेहाच्या उपचारासाठी त्या बहिणीकडे रहाण्यासाठी मुंबईत आल्या होत्या. प्रदीर्घ आजारपणामुळे त्या मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होत्या.


विद्यार्थ्यांच्या शालेय बसची भाडेवाढ !

मुंबई – विद्यार्थ्यांची ने-आण करणार्‍या शालेय बसचे भाडे १ एप्रिलपासून वाढणार आहे. ‘स्कूल बस ओनर्स असोसिएशन’ने (एस्.बी.ओ.ए.) मुंबईसह राज्यात १८ टक्के दरवाढ करण्याची घोषणा केली आहे. राज्य सरकारने बेकायदा विद्यार्थी वाहतुकीला आळा घातल्यास दरवाढ रहित करण्यात येईल, असे ‘एस्.बी.ओ.ए.’चे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी सांगितले.


नाशिक येथे पत्नीची हत्या

नाशिक – येथील गंगापूर रस्ता भागात पतीने पत्नीची हत्या केली आहे. पतीने पत्नीवर कोयत्याने वार केले. त्यानंतर तिला कुकरच्या झाकणाने मारहाण केली. यामध्ये सविता गोरे यांचा जागीच मृत्यू झाला, तर घटनेनंतर पसार झालेल्या आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली. मुलीने प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून गोरे दांपत्यात गेल्या काही दिवसांपासून वाद चालू होता.


२ धर्मांध अमली पदार्थ तस्कर अटकेत

मुंबई – ‘कोडीयन’ या अमली पदार्थांची तस्करी करणार्‍या रफिक सय्यद आणि वहाबुल खान यांना गोवंडीच्या शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून कोडीयन सिरपच्या २४० बाटल्या हस्तगत केल्या आहेत. अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी गस्त घालणार्‍या पोलिसांनी दुचाकीवरून जाणार्‍या दोघांना हटकल्यावर पळून जाण्याच्या प्रयत्नात असतांना पोलिसांनी पाठलाग करून त्यांना कह्यात घेतले.


वर्धा येथे ९ वर्षीय शाळकरी मुलीवर अत्याचार !

वर्धा – येथील श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ९ वर्षीय शाळकरी मुलीवर ५९ वर्षीय वासनांधाने अत्याचार केला. शाळेत जाणार्‍या मुलीला बळजोरीने झाडांमागे ओढत नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी पालकांनी तक्रार प्रविष्ट केली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला कह्यात घेतले.

संपादकीय भूमिका : पालकांनो, आपल्या लेकी-बाळींचे रक्षण करण्यासाठी त्यांना वेळीच स्वसंरक्षण प्रशिक्षण शिकवा !