पुणे शहरात उत्सवांमध्ये आवाजाची मर्यादा शिथिल !

गणेशोत्सवासाठी ६ दिवस, नवरात्रीत मिळणार २ दिवस !

पुणे – जिल्ह्यासाठी वर्षभरातील उत्सवांसाठी ध्वनीक्षेपक आणि ध्वनीवर्धक यांच्या वापरासाठी जिल्हा प्रशासनाने १५ दिवस निश्चित केले आहेत. त्यात गणेशोत्सवासाठी ६ दिवस, तर नवरात्रीसाठी २ दिवस ध्वनीमर्यादा सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत शिथिल करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी याविषयीचे आदेश दिले आहेत.

केंद्र सरकारच्या ध्वनीप्रदूषण (नियमन आणि नियंत्रण) सुधारित नियमानुसार जिल्ह्यात १५ दिवसांसाठी ध्वनीक्षेपक आणि ध्वनीवर्धक यांच्या वापरासाठी सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत वापर करण्यासाठी अनुमती देण्यात आली आहे. त्यात शिवजयंती – १९ फेब्रुवारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती – १४ एप्रिल, महाराष्ट्रदिन – १ मे, गणपति उत्सव, ईद ए मिलाद आणि अनंत चतुर्दशीपर्यंत १ ते ६ सप्टेंबरपर्यंत, नवरात्री उत्सव – १ आणि २ ऑक्टोबर, नाताळ २५ डिसेंबर अन् वर्षाअखेर ३१ डिसेंबर असे १३ दिवस असतील. तसेच महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी आवश्यकतेनुसार २ दिवस अनुमती दिली जाईल, असेही डूडी यांनी काढलेल्या आदेशात नोंद करण्यात आले आहे.

उत्सवाच्या दिवशी ध्वनीची विहित मर्यादा राखून ध्वनीक्षेपक आणि ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करावा. ठरलेल्या मर्यादेपेक्षा अधिक आवाज ठेवू नये. ही सूट शांतता क्षेत्रात लागू नसल्याने त्याची कार्यवाही करण्याचे दायित्व संबंधित सर्व यंत्रणांचे राहील, असेही आदेशात नोंद करण्यात आले आहे.