
सातारा, १४ फेब्रुवारी (वार्ता.) – श्रीक्षेत्र सज्जनगड येथील श्रीदासनवमी महोत्सवास आजपासून प्रारंभ झाला. १३ ते २३ फेब्रुवारी २०२५ म्हणजेच माघ कृष्ण प्रतिपदा ते माघ कृष्ण दशमी या कालावधीत दासनवमी महोत्सव पार पडत आहे. यानिमित्ताने मंदिरातील सर्व मूर्तींना मंदिराबाहेर आणून अभ्यंगस्नान, उद्वार्चन (स्वच्छता आणि स्थापना) करण्यात आले. यानंतर आध्यात्मिक कार्यक्रमास प्रारंभ झाला.
परळी ग्रामपंचायत, ‘श्री रामदास स्वामी संस्थान’ आणि ‘श्री समर्थ सेवा मंडळ’ यांच्या संयुक्त विद्यमाने येणार्या भाविकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आल्या आहेत. ९ दिवसांच्या सेवेसाठी राज्यभरातील महंत, मठपती, मानकरी गडावर आले आहेत. काकड आरती, श्रीराम, श्री समाधी महापूजा, सांप्रदायिक भजन, महानैवेद्य, आरती, छबीना, समाधीस मानाच्या १३ प्रदक्षिणा, करुणाष्टके, सवाया, देवतांची दृष्ट, श्रीमंत दासबोध वाचन, कीर्तन, प्रवचन आदी कार्यक्रम होणार आहेत. परळी ग्रामपंचायतीच्या वतीने गडावर पाणीपुरवठा चालू करण्यात आला आहे. यात्रा कालावधीत अधिकच्या गाड्या एस्.टी. महामंडळाच्या वतीने सोडण्यात आल्या आहेत. येणार्या भाविकांसाठी दोन्ही संस्थांकडून महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. उत्सवकाळातील प्रवचन, कीर्तन, गायन कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन अध्यक्ष तथा अधिकारी स्वामी पू. भूषण महारुद्र स्वामी आणि ‘श्री समर्थ सेवा मंडळा’चे कार्याध्यक्ष योगेशबुवा रामदासी यांनी केले आहे.